ग्वाल्हेर : मुंबईचा डावखुरा आक्रमक फलंदाज यशस्वी जैस्वाल याने झळकावलेल्या तडाखेबंद द्विशतकाच्या जोरावर शेष भारत संघाने इराणी चषक सामन्याच्या पहिल्याच दिवशी मध्य प्रदेशविरुद्ध (एमपी) ८७ षटकांत ३ बाद ३८१ धावांची भक्कम मजल मारली. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन यानेही शानदार शतक ठोकत यशस्वीला चांगली साथ दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या शेष भारताने कर्णधार मयांक अग्रवालचा (२) बळी झटपट गमावला. यानंतर मात्र वर्चस्व राहिले ते अभिमन्यू-यशस्वी यांचे. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ४९२ चेंडूंत तब्बल ३७१ धावांची भागीदारी करत शेष भारताला सामन्यावर घट्ट पकड मिळवून दिली. या दोघांना कुठे आणि कसा चेंडू टाकावा याच विचारात मध्य प्रदेशच्या गोलंदाजांची हवा निघाली. अखेर ८५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर आवेश खानने यशस्वीला त्रिफळाचीत करून ही जोडी फोडली. यानंतर पुढच्याच चेंडूवर अभिमन्यू धावबाद झाल्याने मध्य प्रदेशच्या संघात उत्साह संचारला.
यशस्वीने २५९ चेंडूंत ३० चौकार आणि ३ चौकारांसह २१३ धावांची तडाखेबंद खेळी केली. अभिमन्यूने २४० चेंडूंत १७ चौकार आणि २ षटकारांसह १५४ धावा फटकावल्या. या दोघांना बाद करण्यात मध्य प्रदेशला यश जरी आले असले, तरी तोपर्यंत फार उशीर झालेला असल्याने शेष भारताच्या वर्चस्वाला धक्का बसला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सौरभ कुमार (०*) आणि बाबा इंद्रजित (३*) खेळपट्टीवर होते. आवेश खानने दोन बळी घेत मध्य प्रदेशकडून झुंज दिली.
यशस्वीचे विक्रम
इराणी सामन्यात द्विशतक ठोकणारा यशस्वी जैस्वाल नववा फलंदाज ठरला. याआधी असा पराक्रम गुंडप्पा विश्वनाथ, पार्थसारथी शर्मा, सुरींदर अमरनाथ, प्रवीण आमरे , रवी शास्त्री, युवराज सिंग, मुरली विजय आणि रिद्धिमान साहा यांनी केला होता.
इराणी चषक सामन्यात द्विशतक ठोकणारा २१ वर्षीय यशस्वी सर्वात युवा फलंदाज ठरला. यासह त्याने प्रवीण आमरे यांचा १९९० साली नोंदवलेला विक्रम मोडला. आमरे यांनी वयाच्या २२व्या वर्षी द्विशतक ठोकले होते.
संक्षिप्त धावफलक
शेष भारत (पहिला डाव) : ८७ षटकांत ३ बाद ३८१ धावा (यशस्वी जैस्वाल २१३, अभिमन्यू ईश्वरन १५४, सौरभ कुमार खेळत आहे ०, बाबा इंद्रजित खेळत आहे ३ आवेश खान २/५१.)
Web Title: Yashasvi Jaiswal's double century; Abhimanyu's century too, Rest of India on top against MP
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.