बंगळुरु :
युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने सलग दुसरे रणजी शतक झळकवत मुंबईला प्रतिकूल स्थितीतून बाहेर आणले. यशस्वीच्या जोरावर मुंबईने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ५ बाद २६० धावा अशी मजल मारली. यष्टिरक्षक हार्दिक तामोरे यानेही महत्त्वपूर्ण नाबाद अर्धशतकी खेळी करत मुंबईला सावरले. यशस्वीने २२७ चेंडूंत १५ चौकारांसह १०० धावांची संयमी खेळी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या उत्तर प्रदेशने पहिल्याच षटकात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याला बाद करून जबरदस्त सुरुवात केली. अरमान जाफर (१०) आणि गेल्या सामन्यात पदार्पणात द्विशतक ठोकलेला सुवेद पारकर (३२) फारशी चमक न दाखवताना बाद झाल्याने मुंबईचा डाव ३ बाद ८७ धावा असा गडगडला. परंतु, एक बाजू लावून धरलेल्या यशस्वीने मुंबईला सावरले.
त्याने आक्रमकतेला मुरड घालत जबाबदारीने खेळताना सरफाझ खानसोबत चौथ्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली. सरफराझने ५२ चेंडूंत ५ चौकारांसह ४० धावा केल्या. करण शर्माने त्याला बाद केले. यानंतर यशस्वीने हार्दिकसह पाचव्या गड्यासाठी ६३ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. ही जोडी जमली असल्याचे दिसत असतानाच यशस्वी शतक पूर्ण केल्यानंतर लगेच बाद झाला. करणनेच त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर हार्दिकने दिवसभर टिकून राहताना ७४ चेंडूंत नाबाद ५१ धावांची खेळी करत ६ चौकार व एका षटकारासह आक्रमकता दाखवली. त्याने आणि शम्स मुलानीने (१०*) अखेरपर्यंत नाबाद राहताना मुंबईची आणखी पडझड होऊ दिली नाही. वेगवान गोलंदाज यश दयालनेही २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ८७ षटकांत ५ बाद २६० धावा (यशस्वी जैस्वाल १००, हार्दिक तामोरे खेळत आहे ५१, सरफराझ खान ४०; यश दयाल २/३५, करण शर्मा २/३९.)
Web Title: Yassvi Jaiswal second consecutive century in ranji trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.