बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये महिला क्रिकेट सामन्यांचा थरार २९ जुलैपासून रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान भारतीय संघातील प्रमुख खेळाडू यास्तिका भाटियाने (Yastika Bhatia) भारतीय संघाच्या गेम प्लॅनबद्दल भाष्य केले आहे. भारतीय संघाचे लक्ष्य फक्त सुवर्ण पदकावर नाव कोरण्याचे आहे, असे यास्तिकाने सामन्याच्या एक दिवस आधी सांगितले.
यास्तिकाने नेमकं काय म्हटल? "आम्हाला एवढ्या मोठ्या स्पर्धेत देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान आहे आणि या संधीबद्दल आभारी देखील आहोत. देशासाठी खेळताना गर्व वाटत असून आम्हाला कसे सुवर्ण पदक जिंकता येईल यावर आम्ही काम करत आहोत. आमचा संघ पहिल्यांदाच एजबेस्टनमध्ये खेळणार आहे. त्यामुळे आम्ही नवीन आव्हाने पेलण्यासाठी सज्ज आहोत", असे यास्तिकाने म्हटले.
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताचा दुसरा सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या संघासोबत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील बहुचर्चित सामना ३१ जुलै रोजी खेळवला जाईल, हा स्पर्धेतील पाचवा सामना असेल. तर स्पर्धेतील पहिल्या आणि दुसऱ्या उपांत्यफेरीचा सामना ६ ऑगस्ट रोजी होईल. फायनलचा सामना ७ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, तानिया भाटिया, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम यादव, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा, सिमरन बहादूर.