- अयाझ मेमन
१२व्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या थराराला गुरुवारपासून सुरुवात होईल. व्यवस्थापन आणि आर्थिकदृष्ट्या यंदाची विश्वचषक स्पर्धा आतापर्यंतची सर्वात
मोठी आणि रोमांचक स्पर्धा ठरेल हे नक्की. यंदा विश्वविजेतेपदासाठी दहा संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. या विश्व स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून एकूण
१०० करोड रुपयांचा (१४ मिलियन यूएस डॉलर) वर्षाव होईल. यामध्ये विजेता संघ तब्बल ३२ करोड रुपयांचा (४.८ मिलियन डॉलर) धनी होईल. १९७५ साली झालेल्या पहिल्या विश्वचषकादरम्यान एकूण बक्षीस रक्कम एक लाख पौंड (आजच्या चलनात सुमारे १ करोड रुपये) इतकी होती. त्यावेळी विश्वविजेता ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाला ४ हजार पौंड (सुमारे ४ लाख) रक्कम मिळाली होती. तेव्हा आणि आत्ताच्या काळातील आर्थिक गणित केल्यानंतर समोर येणारा फरक आश्चर्यकारक आहे. पण असे असले, तरी यातूनच क्रिकेटची झालेली प्रगती आणि खेळाचा झालेला जबरदस्त प्रसार याचीही माहिती मिळते. क्रिकेटच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे ते सहाजिकंच भारताचे. एकूण उत्पन्नापैकी ७०-७५ टक्के उत्पन्न हे भारतामुळे मिळते. या सर्व आर्थिक गणितातून भारताला बाजूला ठेवले, तर क्रिकेटचे भविष्य मोठ्या प्रमाणात खालावेल.
तसेच, यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक आणि ‘खुली’ स्पर्धा असेल. का? तर गेल्या ११ सत्रांप्रमाणे यंदा एक किंवा दोन संघ संभाव्य विजेते नसतील. आयसीसीच्या क्रमवारीवर नजर टाकल्यास कळेल यंदा ६-७ संघांना विश्वविजेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे. जसजशी खेळाची प्रगती होत आहे, तसतशी मर्यादित षटकाच्या खेळामध्ये प्रत्येक संघातील फरक कमी होत आहे.
यंदा लीग फॉरमॅटचा अवलंब करण्यात आल्याने यंदाची स्पर्धा अधिक आव्हानात्मक असेल. याआधी या पद्धतीने १९९२ सालची विश्वचषक स्पर्धा खेळविण्यात आली होती. त्यामुळे ग्रुप स्टेजप्रमाणे यंदा ‘लक फॅक्टर’ची शक्यता खूप कमी ठरेल. उपांत्य फेरीत पोहचणारे अव्वल ४ संघांविषयी सांगायचे झाल्यास माझी पसंती इंग्लंड, भारत, आॅस्टेÑलिया आणि न्यूझीलंड या संघांना असेल. पण याआधीच सांगितल्याप्रमाणे यंदाची स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असल्याने काही धक्कदायक किंवा निराशाजनक निकालही पाहण्यास मिळतील. त्यामुळेच, ‘कुछ भी हो सकता है!’
>इंग्लंड :
२०१५ सालच्या विश्वचषकातील निराशानजन कमागिरीनंतर इंग्लंडने आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली. लढण्याची वृत्ती, खेळाडूंची प्रगती यामुळे यंदा इंग्लंड सर्वात धोकादायक संघ बनला आहे. आक्रमक फलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंची फळी यामुळे इंग्लंड क्रमवारीतही अव्वल स्थानी पोहचला आहे.
अव्वल खेळाडू : जॉनी बेयरस्टॉ, जो रुट, जोस बटलर.
एक्स फॅक्टर : बेन स्टोक्स.
>भारत :
स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. भारताकडे तंत्रशुद्ध आणि उच्च दर्जाच्या फलंदाजांची फळी असून गोलंदाजीमध्ये जबरदस्त वैविध्यता आहे. प्रेक्षकांच्या प्रचंद अपेक्षांचे ओझे यशस्वीपणे पेलण्याचे मुख्य आव्हान भारतीय संघापुढे असेल.
अव्वल खेळाडू : विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह.
एक्स फॅक्टर :
हार्दिक पांड्या.
>आॅस्टेÑलिया :
गतविजेते आॅस्टेÑलिया गेल्या १८-२० महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हेलकावे खात आहेत. विशेष करुन दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर आॅसी संघ स्थिरावण्यास झगडत आहे. परंतु, स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनानंतर त्यांच्या संघाला उर्जा मिळाली आहे. शिवाय गोलंदाजीही मजबूत असल्याने आॅस्टेÑलिया नक्कीच जेतेपदाच्या शर्यतीत आहे.
अव्वल खेळाडू : स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क
एक्स फॅक्टर : ग्लेन मॅक्सवेल.
>बांगलादेश :
याआधीच्या तुलनेत बांगलादेशने आपला खेळ अधिक उंचावला आहे. त्यांच्याकडे गुणवत्ता असून आता अनुभवही वाढला आहे. याजोरावर ते नक्कीच छाप पाडतील. पण यासाठी त्यांना पूर्ण सांघिक खेळ आणि लक्षपूर्वक खेळ करावा लागेल.
अव्वल खेळाडू : शाकिब अल हसन, मुस्तफिकुर रहिम, तमिम इक्बाल.
एक्स फॅक्टर : मुस्तफिझुर रहमान.
>अफगाणिस्तान :
क्रिकेटमधील त्यांची प्रगती सातत्याने सुरु आहे. स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी त्यांना झुंजावे लागले, पण अखेर त्यांनी यश मिळवले आणि आता ते छाप पाडण्यास उत्सुक आहेत. कोणतेही दडपण नसल्याने त्यांच्यासाठी यंदाची स्पर्धा एक सहल ठरु शकते किंवा साखळी फेरीत ते काही अनपेक्षित निकालही नोंदवू शकतील.
अव्वल खेळाडू : मोहम्मद शाहझादझ मोहम्मद नबी.
एक्स फॅक्टर : राशिद खान.
>वेस्ट इंडिज :
नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्याने कमी क्रमवारीच्या वेस्ट इंडिजकडे धोकादायक संघ म्हणून पाहिले जात आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच विजयी लय मिळाली, तर विंडीज संघ सर्वांसाठीच डोकेदुखी बनेल. संघातील काही विस्फोटक खेळाडूंच्या जोरावर ते आपला दबदबा निर्माण करु शकतात. फिरकी गोलंदाजीत विंडीज संघ कमजोर आहे.
अव्वल खेळाडू : ख्रिस गेल, शाय होप, जेसन होल्डर.
एक्स फॅक्टर : आंद्रे रसेल.
>न्यूझीलंड :
संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत मागे असले, तरी किवी संघाला स्पर्धेतील एक बलाढ्य संघ नाकारता येणार नाही. त्यांच्याकडे अनुभवी आणि आक्रमक फलंदाज असून अप्रतिम अष्टपैलू खेळाडू व वेगवान गोलंदाजही आहेत. फिरकी गोलंदाजीत त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे.
अव्वल खेळाडू : केन विलियम्सन, रॉस टेलर, टेÑंट बोल्ट.
एक्स फॅक्टर : मार्टिन गुप्टील.
>दक्षिण आफ्रिका :
‘चोकर्स’चा डाग पुसण्यासाठी दक्षिण आफ्रिका यंदा थेट जेतेपद पटकावण्यासाठीच खेळतील. दिग्गज एबी डिव्हिलियर्सच्या अचानक निवृत्तीने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या. फलंदाजी काहीशी बेभरवशाची दिसत आहे. मात्र, गोलंदाजी मजबूत असून क्षेत्ररक्षण अपेक्षेप्रमाणे शानदार होईल.
अव्वल खेळाडू : फाफ डूप्लेसिस, हाशिम आमला, कागिसो रबाडा.
एक्स फॅक्टर : क्विंटन डीकॉक.
>श्रीलंका :
गेल्या काही वर्षांपासून हा संघ झगडत आहे. सातत्याने बदलत राहणारे नेतृत्त्व आणि खेळाडू यामुळे लंका संघाला फार फायदा झालेला नाही. तरीदेखील या संघामध्ये आश्चर्यकारक निकाल नोंदवण्याची क्षमता आहे. त्यांना गृहीत धरणे प्रतिस्पर्धी संघाला महागातही पडू शकेल.
अव्वल खेळाडू : अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, दिमुथ करुणारत्ने.
एक्स फॅक्टर : धनंजय डी’सिल्व्हा.
>पाकिस्तान :
क्रिकेट खेळातील सर्वात बेभरवशाचा संघ म्हणून पाकिस्तानची ओळख आहे. एखाद्या दिवशी चमकदार खेळ करणारा हा संघ दुसऱ्या दिवशी सपशेल अपयशीही ठरतो. त्यांच्याकडे नैसर्गिक खेळ करणाºया खेळाडूंची कोणतीही कमी नाही. जेव्हा त्यांचा दिवस असतो, तेव्हा पाकिस्तानसारखा धोकादायक प्रतिस्पर्धी इतर कोणीही नसतो.
अव्वल खेळाडू : सर्फराझ अहमद, बाबर आझम, मोहम्मद आमिर.
एक्स फॅक्टर : फखर झमान.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: This year's World Cup competition is the most challenging
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.