भारताचा दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंग ( Harbhajan Singh) सोशल मीडियावर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चाहत्याशी भिडला. त्याच्या एका ट्विटने खळबळ उडवून दिली. रविवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव झाला. त्यानंतर धोनी अचानक ट्विटरवर ट्रेंड करू लागला. तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्यामुळे धोनी ट्रेंडमध्ये होता. धोनी हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव कर्णधार आहे ज्याने तीन मोठ्या ICC ट्रॉफीवर कब्जा केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११ चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
सोशल मीडियावर धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक करणाऱ्या एका चाहत्याचा समाचार घेत भज्जीने त्याला ट्विटरवर ट्रोल केले. धोनीचे कौतुक करताना या चाहत्याने ट्विटरवर लिहिले की, 'कोच नाही, मेंटॉर नाही, युवा खेळाडूंचा संघ, बहुतांश वरिष्ठ खेळाडूंनी सहभागी होण्यास नकार दिला. याआधी एकाही सामन्यात कर्णधारपद भूषवले नाही. या व्यक्तीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि कर्णधार झाल्यानंतर ४८ दिवसांत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला.''
भज्जीने अचानक ट्विटरवर धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक करणाऱ्या चाहत्याला खडसावले. हरभजन सिंगने धोनीच्या चाहत्याच्या ट्विटला रिट्विट करत लिहिले, 'होय जेव्हा हे सामने खेळले गेले तेव्हा हा तरुण भारताकडून एकटाच खेळत होता. इतर १० खेळाडू नव्हतेच. त्यामुळे त्याने एकट्याने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहेत. अडचण अशी आहे की जेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणताही देश वर्ल्ड कप जिंकतो तेव्हा लोक म्हणतात की ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणत्याही देशाने तो जिंकला आहे, परंतु जेव्हा भारत वर्ल्ड कप जिंकतो तेव्हा लोक म्हणतात की एका कर्णधाराने वर्ल्ड कप जिंकला आहे. खऱ्या अर्थाने हा सांघिक खेळ आहे. सांघिक खेळांमध्ये, खेळाडू एकत्र हरतात आणि जिंकतात.''