नवी दिल्ली : बीसीसीआयने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला क्लीन चीट देत आपल्या करारामध्ये सामील करून घेतले होते. पण बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला शामीने आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शामीचे वैयक्तिक आयुष्य आणि त्याचा खेळ यांचा काहीही संबंध नाही, असे बीसीसीआयने यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने शामीला मॅच फिक्सिंगबाबत प्रश्न विचारले होते. त्यावर शामीने आपण असे काहीही केले नसल्याचे सांगितले. त्यानंतर भ्रष्टाचारविरोधी पथकाने काही गोष्टींची चौकशीही केली. त्यामध्ये शामी दोषी नसल्याचे त्यांना आढळले आणि त्यामुळेच त्याला क्लीन चीट देण्यात आली.
पण 'डीएनए' या वृत्तसमूहाने आपल्या सूत्रांच्या माध्यमातून काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 'डीएनए' च्या सूत्रांनी सांगितले की, " बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने शामीला त्याच्या वैयक्तिक आयुष्यांबद्दलही काही प्रश्न विचारले. यामध्ये आपले एका महिलेशी विवाहबाह्य संबंध आहेत, हे शामीने मान्य केले आहे. त्याचबरोबर या मैत्रिणीला आपण दुबईमध्ये भेटलो होतो, यावृत्तालाही दुजोरा दिला आहे, "
काय आहे प्रकरणहसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.