नवी दिल्ली : बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वातील पाकिस्तानचा संघ आशिया चषक जिंकण्यापासून एक पाऊल दूर राहिला. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. आशिया चषकात श्रीलंकेने सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. याआधी सुपर-4 मधील सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव झाला होता. किताबाच्या लढतीत झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाच्या स्टार खेळाडूने आपली चूक मान्य करून पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच पाकिस्तानच्या पराभवाला मीच जबाबदार असल्याचे त्याने म्हटले आहे.
दरम्यान, फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निराशाजनक सुरूवात केली. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. मात्र राजपक्षा शानदार फलंदाजी करत होता. राजपक्षाने सातव्या बळीसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या.
शादाब खानने मागितली माफी
अंतिम सामन्यात पुनरागमन करणाऱ्या शादाब खानने ट्विट करून माफी मागितली आहे आणि कॅच मॅच जिंकवते असे म्हटले आहे. "माफ करा, मी या पराभवाची जबाबदारी घेतो. मी माझ्या संघाला नाराज केले." नसीम, हरिस रौफ, मोहम्मद नवाज आणि संपूर्ण गोलंदाजी शानदार होती. मोहम्मद रिझवानने जोरदार झुंज दिली. संपूर्ण संघाने आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. या विजयाबद्दल शादाबने श्रीलंकेच्या संघाचे अभिनंदन देखील केले आहे. खरं तर सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात शादाबला विश्रांती देण्यात आली होती, ज्या सामन्यात श्रीलंकेने 5 बळी राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. फायनलच्या सामन्यात शादाबने 4 षटकांत 28 धावा देत साजेशी गोलंदाजी केली. त्यानंतर त्याला फलंदाजी करताना केवळ 8 धावा करता आल्या. शादाब ज्या कॅचबद्दल भाष्य करत आहे तो भानुका राजपक्षाचा होता, जो कॅच पाकिस्तानला चांगलाच महागात पडला आणि राजपक्षा श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला.
Web Title: Yes, the team lost because of me, Shadab Khan took responsibility for Pakistan's defeat and apologized
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.