Join us  

होय, आम्ही भारताला हरवू शकतो: स्मिथ

ऑस्ट्रेलिया संघ सहा कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 10:00 AM

Open in App

- अभिजित देशमुख, लंडन : भारताने आम्हाला ‘होम आणि अवे’  मालिकेत धूळ चारली, हे खरे आहे; पण आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम (डब्ल्यूटीसी) सामन्यात आम्ही त्यांना हरवू शकतो, असा विश्वास  ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सोमवारी व्यक्त केला.

ऑस्ट्रेलिया संघ सहा कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला. भारताविरुद्ध ७ ते ११ जून या कालावधीत द ओव्हलवर खेळल्यानंतर या संघाला यजमान संघाविरुद्ध १६ जूनपासून पाच सामन्यांची ॲशेस मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलिया संघ केंट क्लबमध्ये सराव करीत होता. आज त्यांनी ओव्हल स्टेडियममध्ये  सराव केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना स्मिथ म्हणाला, ‘होय, आम्ही भारताला हरवू शकतो,’ 

चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखाली स्टीव्ह स्मिथ ससेक्स संघाकडून कौंटी क्रिकेट खेळत एक महिन्याहून अधिक काळ इंग्लंडमध्ये आहे. भारतीय गोलंदाजीबाबात विचारताच स्मिथ म्हणाला, ‘शमी आणि सिराज हे दर्जेदार गोलंदाज असून ड्यूक चेंडूवर ते प्रभावी मारा करतील.  याशिवाय जडेजा आणि आश्विन यांच्या रूपात दोन दिग्गज फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे.’२०२१ ला ऑस्ट्रेलिया संघ डब्ल्यूटीसी फायनल गाठू शकला नव्हता. याविषयी विचारताच तो म्हणाला, ‘ती संधी हुकली; पण दोन वर्षांनंतर अंतिम फेरी गाठल्याचा आनंद आहे. फायनलपर्यंतची वाटचाल चांगलीच राहिली.’ 

‘इंग्लंड दौऱ्यात सहा कसोटी खेळणार असलो तरी एका वेळी एका सामन्याचाच विचार केलेला बरा; पण सर्वांत महत्त्वाचा असेल तो डब्ल्यूटीसी अंतिम सामना. आम्ही आणि भारतीय संघ याच सामन्याच्या प्रतीक्षेत आहोत,’ असे स्मिथने सांगितले. जोश हेजलवूडची पोकळी भरून काढण्यासाठी आमच्याकडे इतरही खेळाडू असल्याचे तो म्हणाला. डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी निवृत्तीच्या निर्णयावर स्मिथ म्हणाला, ‘डेव्हिडने विचारपूर्वक निर्णय घेतला असावा. मी मात्र कसोटीतून निवृत्त होण्याचा विचार अद्याप केलेला नाही.’

----००००---- 

टॅग्स :स्टीव्हन स्मिथ
Open in App