नवी दिल्ली: 'सध्या आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम हटवण्यावरून मोठी चर्चा सुरू आहे. पण, नियम हटविण्याचा निर्णय झाला तरी फारसा फरक पडणार नाही. आयपीएलमध्ये मोठ्या धावसंख्या तरीही रचल्या जातील, असे मत दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमादरम्यान पाँटिंग यांनी म्हटले की, 'सध्या इम्पॅक्ट प्लेअर नियम आयपीएलमध्ये असावा की नसावा, यावर चर्चा सुरू आहे. पण, हा नियम हटविल्यानंतर खरंच मोठ्या धावसंख्या उभारल्या जाणार नाही का? मला हे पाहण्याची उत्सुकता आहे. होय, या नियमामुळे सध्या आघाडीच्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांना थोडा दिलासा मिळत आहे. पण, माझ्या मते, आघाडीच्या फळीतील फलंदाज कायम एका विशिष्ट शैलीने खेळत असतात. माझ्या सांगण्याचा अर्थ म्हणजे, जॅक फ्रेजर मॅकगर्क किंवा ट्रेविस हेड यांना सावध पवित्रा घेऊन खेळण्यास सांगणे कठीण आहे.'
यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ३६ वेळा २०० किंवा त्याहून अधिकच्या धावसंख्या रचल्या गेल्या आहेत. गेल्या सत्रात अशी कामगिरी ३७ वेळा झाली होती. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही इम्पॅक्ट प्लेअरबाबत गरज पडल्यास पुनर्विचार होऊ शकतो, असे म्हटले होते.
पारंपरिक तंत्राच्या फलंदाजांना कमी संधी
क्रिकेटमध्ये गेल्या एका दशकात झालेल्या बदलाविषयी पॉटिंग म्हणाले की, 'इंग्लंड ज्या पद्धतीने खेळतायत, त्याकडे बघा. त्यांनी अजूनही ही रणनीती योग्यप्रकारे अमलात आणलेली नाही. खेळाडू खूप जास्त एकदिवसीय किंवा टी-२० क्रिकेट खेळून आलेत. कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही पारंपरिक तंत्राने खेळणाद्यांसाठी जागा आहे, पण त्यांना मिळणारी संधी कमी होत आहे. गेल्या दहा वर्षांत आधुनिक फलंदाजांमध्ये पारंपरिक तंत्र दिसून येत नाही. तरी ज्यो रूट सर्वाधिक पारंपरिक शैलीचा फलंदाज आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुरोन थोडे वेगळे आहेत. विराट कोहली पारंपरिक आणि तंत्राच्या जोरावर खूप चांगला आहे. पण, त्याच्या खेळामध्येही थोडा बदल झाल्याचे मला वाटते.'
इम्पॅक्ट प्लेअर नियम असावा : रवी शास्त्री
'आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम कायम राहिला पाहिजे. यामुळे अटीतटीचे सामने पाहण्यास मिळतात.' असे सांगत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी डम्पॅक्ट प्लेअर नियमाचे समर्थन केले. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेला योग्य न्याय मिळत नसल्याचे काही खेळाडू आणि क्रिकेट विशेषज्ञांचे म्हणणे आहे.
शास्त्री म्हणाले की, 'जेव्हा नवीन नियम येतो, तेव्हा अनेक जण तो नियम कसा योग्य नाही, हे सांगण्याचा प्रयल करतात. पण वेळेनुसार जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्या पाहता तेव्हा खेळाडू या नियमामुळे मिळणाऱ्या संधीचा कसा फायदा घेतात हे दिसून येते. त्यामुळे या नियमावर पुन्हा मतपरिवर्तन झालेले पाहण्यास मिळेल, शास्त्री यांनी रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'इम्पॅक्ट प्लेअर नियम चांगला आहे. वेळेनुसार तुम्हालाही विकसित व्हावे लागेल. अन्य खेळांमध्येही असे नवे नियम आणलेले पाहण्यास मिळतात. अशा नियमांमुळे अटीतटीचे सामने रंगताना दिसून येतात.'