चेन्नई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ऋषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टोइनिस या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नावाजलेल्या फटकेबाजांना इच्छेनुसार यॉर्कर टाकून धावा काढू दिल्या नाहीत. चिन्नप्पापट्टी येथे टेनिस बॉल क्रिकेट खेळून आज सनरायझर्स हैदराबादकडून भल्याभल्या फलंदाजांना नामोहरम करणारा, हा गोलंदाज आहे टी. नटराजन.
क्रिकेटमध्ये पैसे कमवून २९ वर्षाच्या मुलाने कुटुंबासाठी सर्वकाही केले. घर बांधले, बहिणींच्या शिक्षणाची व्यवस्था केली. चेन्नईपासून ३४० किलोमीटर दूर सालेम जिल्ह्यातील चिन्नप्पापट्टी या लहान गावात अकादमी उघडली. यामुळे सहकाऱ्यांना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन लाभले. मात्र आईला रस्त्याच्या कडेला चिकन विकण्यापासून तो परावृत्त करू शकला नाही.
नटराजनचे वडील साडीच्या कारखान्यात कामाला होते. आई मोलमजुरी करायची. नटराजन क्रिकेटमध्ये निपुण होता. वेगवान गोलंदाजी करणे त्याला आवडे. त्याच्या यॉर्क रला तोंड देणे सर्वांना अवघड जायचे. तामिळनाडूमध्ये टेनिसबॉल क्रिकेटमध्ये तो नावारूपास आला. बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानप्रमाणे यॉर्कर टाकण्याच्या क्षमतेमुळे, त्याला अनेक जण ‘तमिळनाडूचा मुस्तफिजुर’असे संबोधत होते. अभिनव मुकुंद व वॉशिंग्टन सुंदर या फलंदाजांविरुद्ध सहा यॉर्कर चेंडू टाकत त्याने लक्ष वेधून घेतले. २०१७ ला आयपीएल लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने तीन करोड इतकी रक्कम मोजत संघात सामील केले. त्याला सहा सामने खेळायला मिळाले. मात्र, तो दोन बळी मिळवू शकला. २०१८ मध्ये मुरलीधरनने त्याचा समावेश सनरायझर्स हैदराबाद संघात केला.२०१८ व २०१९या दोन्ही हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दिल्लीविरुद्ध हैदराबादला विजय मिळवून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. स्थानिक क्रिकेटमध्ये तामिळनाडूच्या गोलंदाजीचा तो आधारस्तंभ मानला जातो.आर्थिक स्थिती चांगली नसताना याच व्यवसायाने कुटुंबाचा गाडा ओढण्यास मदत झाली, अशी त्याच्या आईची भावना आहे.‘मी नटराजनच्या कामगिरीमुळे आश्चर्यचकित नाही. त्याने कठोर मेहनत घेत आणि अनेक संकटांचा सामना करत हा मार्ग प्रशस्त केला. जखमेवर मात करीत तामिळनाडूकडून देदीप्यमान कामगिरीच्या बळावर आयपीएलपर्यंत पोहोचला. या गोलंदाजाने काल १४ आणि १८ व्या षटकात अनेक यॉर्करचा भडिमार केला. फलंदाजांना त्याने घाम फोडला.’- जयप्रकाश, कोच