यॉर्क : अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजमध्ये खोऱ्यानं धावा करत असताना दुसरीकडे आणखी एक मुंबईकर परदेशात धुमाकुळ धालत आहे. मुंबईची बिनधास्त गर्ल जेमिमा रॉड्रीग्जने सोमवारी किया महिला सुपर लीग ट्वेंटी-20 लीगमध्ये जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला. जेमिमाने तुफान फटकेबाजी करताना यॉर्कशायर डायमंड संघाला अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवून दिला. यॉर्कशायर डायमंड संघाने 4 विकेट्स राखून साऊदर्न व्हायपर्स संघावर मात केली.
सुजी बॅट्स ( 47), डॅनिएल वॅट ( 42), टॅमी बीमाऊंट ( 33), मैया बाऊचर ( 23*) आणि अॅमडा वेलिंग्टन ( 24*) यांनी दमदार खेळी करताना व्हायपर्स संघाला 4 बाद 184 धावांचा डोंगर उभा करून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना डायमंड्स संघाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे सलामीवीर अवघ्या 28 धावांत माघारी परतले. जेमिमा वगळता मधल्या फळीतील अन्य फलंदाजही झटपट माघारी परतले. मात्र, जेमिमाने एकाकी खिंड लढवताना अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक 10 धावा केल्या.
जेमिमाने 58 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 112 धावा चोपल्या. तिने पहिल्या 20 चेंडूंत आठ चौकार खेचत 42 धावा केल्या. त्यानंतर 26 चेंडूंत तिने अर्धशतक पूर्ण केले. जेमिमाने हॉली अर्मिटॅगसोबत 54 चेंडूंत 90 धावांची भागीदारी केली. त्यानंतर डायमंड्सची पडझड पुन्हा सुरू झाली. पण, जेमिमाचा झंझावात कायम होता. 51 चेंडूंत जेमिमाने शतकाची वेस ओलांडली. तिच्या या शतकी खेळीत 16 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता.
जेमिमा रॉड्रीग्जची विक्रमी खेळी
- 58 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकारासह नाबाद 112 धावा
- 51 चेंडूंत शतक पूर्ण, किया सुपर लीगमधील सर्वात जलद शतक
- 2018च्या फायनलमध्ये लिझली ली हीने 55 चेंडूंत शतक केले होते.
- स्मृती मानधनानंतर या लीगमध्ये शतक झळकावणारी दुसरी परदेशी खेळाडू
- ट्वेंटी-20 लीगमध्ये परदेशी खेळाडूने नोंदवलेली ( 112*) सर्वोत्तम कामगिरी