भारतीय क्रिकेटमध्ये सध्या परिवर्तनाची लाट आलेली पाहायला मिळतेय... त्यामुळेच भविष्याचा विचार करून BCCI ने काही सीनियर खेळाडूंना कसोटी संघातून वगळण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये माजी उप कर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि वृद्धीमान सहा यांचा समावेश आहे. अजिंक्य आणि पुजारा हे रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून पुनरागमनही करू शकतात, परंतु इशांत व वृद्धीमान यांच्यासाठी आता कसोटी संघाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत. अजिंक्यने आजच त्याच्या कारकीर्दिवर भाष्य करणाऱ्यांना चांगलेच झोडपले आहे. त्यात भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमानी ( Former India wicket-keeper Syed Kirmani ) यांनी BCCIमधील राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
३७ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान सहा याला किरमानी यांनी पूर्णपणे पाठींबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी एक वृत्त आले होते की, सहाने रणजी करंडक २०२२मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघ व्यवस्थापनानेही कसोटीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही असे सांगितले आहे. सहासाठी ही धक्का देणारी गोष्ट आहे. युवा यष्टिरक्षक रिषभ पंतवर आता प्रसिद्धी झोतात आहे. वृद्धीमान सहा दशकापासून भारताच्या कसोटी संघात आह, परंतु त्याला केवळ ४० कसोटी सामनेच खेळण्याची संधी मिळाली.
वृद्धीमान सहा हा राजकारणाचा बळी पडला, असे मत किरमानी यांनी व्यक्त केले. तो कोणत्याच गटातील नसल्याने त्याला अशी वागणुक मिळाली आणि तो अजूनही खेळू शकतो, असेही किरमानी म्हणाले. ''भारतासाठी तू उल्लेखनीय कामगिरी केली आहेस आणि तू कधीच हार मनली नाहीस, जे प्रशंसनीय आहे. तूला वगळण्यात आले कारण, तू कोणत्या एका गटातला नाहीस. तू राजकारणाचा बळी ठरला आहेस. एक चांगला यष्टिरक्षक म्हणून माझ्या स्मरणात तू नेहमी राहशील,''असे किरमानी यांनी MidDay ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, ''सहा अजूनही बेस्ट यष्टिरक्षक आहे, यात शंकाच नाही, परंतु आक्रमक फलंदाजीमुळे रिषभ पंतला संधी मिळाली. वयाच्या ३७ व्या वर्षीही सहा उत्तम किपिंग करू शकतो. त्यानं निराश होऊ नये. दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल यांनाही असेच वगळण्यात आले.''