पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) आठव्या पर्वासाठी गुरूवारी प्लेअर्स ड्राफ्ट झाले. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे अनेक स्टार खेळाडू आणि लीगशी संबंधित माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानही ( Mohammad Rizwan) या कार्यक्रमाला उपस्थित होता. रिझवान मुलतान सुलतान्स संघाचा कर्णधार आहे आणि २०२१ च्या स्पर्धेत त्यांनी जेतेपद पटकावले होते. या कार्यक्रमात रिझवानने पीएसएल आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यांच्यातील तुलना करताना मोठा दावा केला आणि सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.
२००८ पासून सुरु झालेली आयपीएल ही जगातील सर्वात मोठी व प्रसिद्ध लीग आहे. पण, रिझवानच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान सुपर लीग ही जगातील टफ लीग आहे. ''पाकिस्तान सुपर लीगने जगाला अचंबित केले आहे. PSL यशस्वी होणार नाही अशी सुरुवातीला चर्चा रंगली, परंतु आता PSL ने काय धुमाकूळ घातलाय हे आम्हाला माहित्येय. IPL आहे, परंतु तुम्ही जगभरातील खेळाडूंना जेव्हा विचाराल, तेव्हा ते हेच सांगतील की पाकिस्तान सुपर लीग ही सर्वात टफ लीग आहे,''असे तो म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''येथे जे खेळाडू राखीव आहेत, ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही बेंचवर बसले आहेत. पाकिस्तानला चांगले बॅकअप खेळाडू मिळत आहेत आणि त्याचे श्रेय पीएसएलला मिळाले पाहिजे.''
पाकिस्तान सुपर लीग कुठे अन् IPL कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही!
पाकिस्तानचा ३५ वर्षीय गोलंदाज वाहब रियाझने काही महिन्यांपूर्वी वेगळं मत मांडले होतं. तो म्हणालेला की, ''आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे स्टार खेळतात. बीसीसीआय अन्य बोर्डांशी चर्चा करून आयपीएलसाठी विंडो तयार करून घेते. दुसरीकडे ज्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही, त्या खेळाडूंसह PSL खेळवली जाते. आयपीएलमध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या पगाराची रक्कमही मोठी असते, तर PSLमध्ये कमी पगार दिला जातो. PSLची IPLसोबत तुलना होऊच शकत नाही. आयपीएलचा एक वेगळाच स्थर आहे. फक्त PSLच नव्हे, तर जगातील कोणतीच लीग IPLशी स्पर्धा करू शकत नाही. पण, गोलंदाजीच्या स्टँडर्डचा विचार केल्यास, PSL हे आयपीएलवर वरचढ ठरेल.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"