माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांतीवर गेला आहे. 38 वर्षीय धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना रिषभ पंतकडे त्याचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी तर आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पंत हाच आमचा पहिला पर्याय असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. पण, पंत सातत्यानं साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही त्याला सूर गवसलेला नाही. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारानं पंतकडून एक अपेक्षा करू नका, असं स्पष्ट मत मांडलं.
धोनीचा वारसदार म्हणून पंतवर आधीच प्रचंड दडपण आहे आणि त्यामुळे त्याच्या खेळावरही परिणाम जाणवत असल्याचे अनेकांचे मत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ज्या पद्धतीनं त्याच्याकडून खेळ होतो, तसा खेळ करण्यात तो अपयशी ठरत आहे. वन डे क्रिकेटमध्ये त्यानं 22.90च्या सरासरीनंच धावा केल्या आहेत. पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तोच मोठ्या अपेक्षांचं ओझ घेऊनच, असं लाराला वाटतं.
लारा म्हणाला,''रिषभ पंत प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्यात प्रचंड आक्रमकता आहे आणि भारतीय चाहते त्याच्याकडे महेंद्रसिंग धोनीचा पर्याय म्हणून पाहत आहेत. असं झटक्यात कोणी धोनीची जागा घेऊ शकत नाही आणि हे दोघेही विभिन्न खेळाडू आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेला 8-9 महिनेच राहिले आहेत आणि टीम इंडियासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. ते राखीव यष्टिरक्षकासह वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतात, परंतु पंतवर अनावश्यक ताण येत आहे. धोनीचा पर्याय म्हणून पंतनं स्वतःला त्वरित सिद्ध करावे, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे.''
काल झालेल्या सामन्यात पंतकडून झेल सुटले आणि पुन्हा एकदा मैदानावर धोनी नामाचा गजर झाला. कर्णधार विराट कोहलीनं प्रेक्षकांच्या या वागण्यावर नाराजी प्रकट केली.