नवी दिल्ली : ‘आयपीएलचे सामने ‘विनाब्रेक’ खेळता, मात्र देशाकडून खेळण्याची वेळ येताच वर्कलोडचे कारण पुढे करीत विश्रांती का घेता?’ असा खोचक प्रश्न माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना मंगळवारी केला. विराट, रोहित, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांना आगामी विंडीज दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. नेमक्या याच गोष्टीवरून गावसकर यांनी या खेळाडूंची चांगलीच कानउघाडणी केली.
‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना गावसकर म्हणाले, ‘मी खेळाडूंना विश्रांती देण्याशी मुळीच सहमत नाही. तुम्ही आयपीएल खेळताना विश्रांती घेत नाही, मग देशासाठी खेळतेवेळी तुम्हाला विश्रांती का हवी. तुम्हाला देशासाठी खेळावेच लागेल. विश्रांतीची मागणीदेखील करू नका. टी-२० हा केवळ २० षटकांचा सामना. याचा तुमच्या शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.’
‘कसोटी सामन्याचा मानसिकतेवर आणि शरीरावर परिणाम होतो, हे मी समजू शकतो. मात्र टी-२० मुळे काही समस्या जाणवत असेल, असे वाटत नाही. बीसीसीआयने विश्रांती धोरणात हस्तक्षेप करावा. ग्रेड ‘अ’मध्ये असलेल्या खेळाडूंना मोठ्या रकमेचे करार मिळाले. त्यांना प्रत्येक सामन्यासाठी चांगली रक्कम मिळते. सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकांना इतक्या सुट्या देणारी एकतरी कंपनी आहे का? ’असा सवालदेखील गावसकर यांनी उपस्थित केला.