Join us  

लीडर होण्यासाठी कर्णधार असण्याची गरज नाही, कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीनेे मांडली भूमिका

Virat Kohli : विराट कोहलीने नुकतेच कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये त्याच्याकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले होते, तर सप्टेंबरमध्ये त्याने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 8:54 AM

Open in App

नवी दिल्ली : विराट कोहलीने नुकतेच कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये त्याच्याकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले होते, तर सप्टेंबरमध्ये त्याने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. या सर्व घडामोडींनंतर विराट आणि बीसीसीआय यांच्यात फूट पडल्याचे जाणवले. विराटने कसोटीचे कर्णधारपद का सोडले, यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आता खुद्द विराटनेच याविषयीचे मौन सोडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-२ अशा पराभवानंतर विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आपण राजीनामा का दिला हे त्याने पूर्णपणे स्पष्ट केले नसले  तरी कर्णधारपद का सांभाळू शकत नाही, हे त्याने उघड केले. ‘फायरराइड चॅट’शी संवाद साधताना विराट म्हणाला, ‘लीडर होण्यासाठी कर्णधार असण्याची गरज नाही. महेंद्रसिंह धोनीने भारताचे कर्णधारपद सोडले, तेव्हा तो देखील संघाचा एक भाग होता. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरही तो संघाचा प्रमुख होता. धोनीकडून आम्ही अनेक टिप्स घेतल्या. जेव्हा मी भारताचा कर्णधार झालो, तेव्हा संघाची संस्कृती बदलण्याचे माझे ध्येय होते. कारण भारतात कौशल्याची कमतरता नाही. जगात क्वचितच असा कोणताही देश असेल ज्याकडे असे कुशल खेळाडू असतील.’मोठे होणे हा देखील नेतृत्वाचा एक भाग आहे. मला वाटते की, प्रत्येक भूमिकेसाठी आणि जबाबदारीसाठी तयार असले पाहिजे. मी धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो आणि नंतर कर्णधार झालो; पण माझी विचारसरणी नेहमी सारखीच होती. मी नेहमी एक कर्णधार म्हणूनच विचार केला.’ विराटने ६८ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात संघाने ४० सामने जिंकले.

विराट आता भारताकडून फलंदाज म्हणून खेळेल. यावर तो म्हणाला, ‘मला वाटते, तुम्हाला काय मिळवायचे आहे आणि तुम्ही ते साध्य केले की नाही याची समज असायला हवी. प्रत्येक गोष्टीची एक कालमर्यादा असते. तुम्हाला याची जाणीव असायला हवी. एक फलंदाज म्हणून तुम्ही संघाला अधिक देऊ शकता, त्यामुळे त्याचा अभिमान बाळगा.’  

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ
Open in App