IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ स्पर्धा आता ९ दिवसांवर आली आहे आणि मुंबई इंडियन्स नवा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली जेतेपदासाठी जोर लावणार आहे. गुजरात टायटन्सला मागील दोन पर्वांत फायनलमध्ये घेऊन गेला होता आणि आता त्याची घरवापसी झाली आहे. मुंबई इंडियन्सने दोन दिवसांपूर्वी त्याच्या आगमनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हार्दिकवर भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारने ( Praveen Kumar ) गंभीर आरोप केले आहेत. हार्दिकला आयपीएलच्या दोन महिन्यांपूर्वी दुखापत होते आणि तो देशांतर्गत स्पर्धा किंवा देशासाठी खेळत नाही. कारण लीगमध्ये सहभाग घेऊन पैसे कमवण्यावर त्याचे लक्ष आहे.
हार्दिकच्या भोवती अशी चर्चा होण्याची क्रिकेट जगतातील ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांमध्ये हार्दिकला दुखापत झाल्यामुळे सोशल मीडियावर नेहमीचा चर्चा झाली. भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना मिळालेल्या वागणुकीवरून अप्रत्यक्षपणे हार्दिकवर निशाणा साधला होता. “ते श्रेयस आणि इशान दोघेही प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. हार्दिक सारख्या खेळाडूंना रेल बॉल क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेट अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही,” असे इरफानने लिहिले होते.
प्रवीण कुमारनेही हार्दिकवर टीका केली आहे. "आयपीएलच्या दोन महिन्यांपूर्वी तुम्ही जखमी होतात, तुम्ही देशासाठी खेळत नाही, तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुमच्या राज्यासाठी खेळत नाही आणि थेट आयपीएलमध्ये खेळता. या गोष्टी चुकीच्या आहेत. पैसे कमवा, त्यात काही चुकीचे नाही. पण तुम्हाला राज्य आणि देशासाठी खेळायचे आहे. आता लोकं फक्त आयपीएललाच महत्त्व देत आहेत", असे प्रवीण म्हणाला.
रोहित शर्माने आणखी एक वर्ष मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करायला हवे, असे स्पष्ट मतही प्रवीणने व्यक्त केले. “हो, रोहितने अजूनही मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवायला हवे होते. केवळ एका वर्षासाठीच नाही, तर तो दोन-तीन वर्षे करू शकतो. पण अखेरीस, निर्णय व्यवस्थापनाच्या हातात आहे,” असेही तो म्हणाला.