Harbhajan Singh Monkeygate Controversy: भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने गेल्या महिन्यात निवृत्ती जाहीर केली. सर्व प्रकारच्या क्रिकेटला त्याने रामराम ठोकला. हरभजनच्या कारकिर्दीत 'मंकीगेट' प्रकरणी खूप गाजलं. सुदैवाने हरभजन त्यातून निष्कलंक सुटला. याच मुद्द्यावर त्याने एका मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला. हरभजन डोक्यावर परिधान करत असलेल्या पगडीवरून त्याला अतिशय खालच्या पातळीवरील टीकेला आणि कमेंट्सना सामोरं जावं लागलं. त्याबाबत त्याने आपला अनुभव सांगितला.
"मी फिल्डिंग करत असताना मला चिडवलं जायचं. मला कळत नव्हतं की असं का घडतंय. त्या प्रकारामुळे खूपच गोंधळलेला होतो. त्यातच जेव्हा मैदानावर माझा वाद झाला, त्यावेळी मी जे बोललो नाही त्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे सहा-सात साक्षीदार तयार होते. कोणी काहीही ऐकलं नव्हतं तरीही छोट्या गोष्टीचा बाऊ करण्यात आला", असं हरभजनने सांगितलं.
"मला माझ्या धर्मावरून आणि डोक्यावरील पगडीवरून अतिशय घाणेरड्या गोष्टी बोलल्या जायच्या. माझ्या धर्माचा असा अपमान मी कसा ऐकून घेणार? पण धर्माच्या अपमानाबाबतही मी गप्प राहिलो. कारण जर मी त्यावरून काही बोललो असतो तर गोष्टी टोकाला गेल्या असत्या. म्हणून मी माझं तोंड उघडलं नाही. संघ व्यवस्थापनाकडेही तक्रार केली नाही. माझे सहकारी माझ्यासोबत होते. त्यामुळे मी खेळावर लक्ष दिलं आणि ऑस्ट्रेलियात भारतासाठी जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा प्रयत्न केला", अशा शब्दात हरभजनने त्यावेळचा घटनाक्रम उलगडला.
मंकीगेट प्रकरणावर सचिननेही आपल्या आत्मचरित्रामध्ये नमूद केलं आहे की जे घडलं त्याला अँड्र्यू सायमंड्स जबाबदार होता. तो हरभजनला सतत डिवचत होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होणार हे मला स्पष्ट दिसत होता. त्यांच्यातील वादाला सुरूवात होत असतानाच मी त्याच्या जवळ गेलो. मी त्याच्या जवळ जात असताना त्याच्या तोंडून मी 'तेरी मा की...' असे शब्द ऐकले. पण त्यापुढे तो काही बोलला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचीच ती चुक होती.