Duleep Trophy final 2022 - पश्चिम विभागाने ( West Zone) आणखी एक दुलीप करंडक ट्रॉफी नावावर केली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट झोन संघाने अंतिम सामन्यात दक्षिण विभाग ( South Zone) चा २९४ धावांनी पराभव केला. वेस्ट झोनने विजयासाठी ठेवलेल्या ५२९ धावांचा पाठलाग करताना साऊथ झोनचा संपूर्ण संघ ७१.२ षटकांत २३४ धावांत तंबूत परतला. यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) ने ३२३ चेंडूंत २६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि त्याला प्लेअर ऑफ दी मॅचने गौरविले गेले. सर्फराज खान यानेही या सामन्यात १७८ चेंडूंत नाबाद १२७ धावा केल्या.
या युवा खेळाडूंच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट झोनने विजय मिळवला. पण, या सामन्यात चर्चा रंगली ती कर्णधार अजिंक्य रहावे व यशस्वी जैस्वाल यांच्यातल्या मैदानावरील एका घटनेची. प्रतिस्पर्धी रवी तेजा फलंदाजी करत असताना यशस्वी वारंवार स्लेजिंग करत होता. रवी तेजाने याबाबत अजिंक्य व अम्पायरकडे तक्रार केली. यशस्वीला एकदा अजिंक्यने समजावले, परंतु त्याने पुन्हा ती चूक केली. त्यानंतर अजिंक्यने त्याला मैदानाबाहेर जाण्या सांगितले आणि काही षटकं वेस्ट झोन १० खेळाडूंसहच खेळला.
त्या प्रकारावर अजिंक्य म्हणाला, तुम्हाला नियमांचं पालन करायलाच हवं आणि खेळ, प्रतिस्पर्धी व अम्पायर्स यांचा आदर करायला हवा. मी नेहमी याच तत्त्वानुसार क्रिकेट खेळत आलोय आणि पुढेही खेळत राहीन. मैदानावर या गोष्टींचं पालन व्हायलाच हवा, तसं तुम्ही करत नसाल, तर मैदानाबाहेर जा. हा माझा मंत्रा आहे. त्यामुळेच मी ती परिस्थिती अशा पद्धतीने हाताळली.
चौथ्या डावातील ५०व्या षटकात जैस्वाल स्लेजिंग करत होता आणि रवी तेजा व त्याच्यात वाद झाला. त्यानंतर ५७व्या षटकात पुन्हा जैस्वालने स्लेजिंग केली आणि त्यानंतर अजिंक्यने त्याला बाहार जाण्यास सांगितले.