इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मध्ये आजचा दिवस तेंडुलकर कुटुंबियांसाठी ऐतिहासिक ठरला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिथे महान फलंदाज सचिन तेंडुलकरने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. त्याच स्टेडियमवर आज अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात मागील दोन वर्ष बाकावर बसून राहिलेल्या अर्जुनने आज पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने दोन षटकं टाकली, परंतु त्याने प्रभावित केले. MIने अर्जुनला पहिले षटक देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवला.
आयपीएलमध्ये खेळणारी सचिन-अर्जुन ही बाप लेकाची पहिलीच जोडी ठरली. सचिननेही मुंबई इंडियन्सचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. अर्जुनचा पदार्पणाचा सामना पाहताना सचिन नक्कीच भारावला असेल, सारा तेंडुलकरही भावाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानावर उपस्थित होती. अर्जुननेही आपल्या कामगिरीने त्यांना निराश नाही केले. त्याच्या दोन षटकांत १७ धावा आल्या. मुंबईने KKRविरुद्धचा हा सामना जिंकला.
सायंकाळी सचिनने अर्जुनच्या पदार्पणावर एक भावनिक ट्विट केले. त्य़ाने लिहिले की,अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस. तुझा वडील या नात्याने, तुझ्यावर प्रेम करणारा आणि खेळाबद्दल उत्कट प्रेम करणारा मी आहे. मला माहित आहे की तुही खेळाचा योग्य तो आदर करत राहशील आणि हा खेळही तुला प्रेम देत राहिल. तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तू हे करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट