मुंबई : साल 2001... भारत आणि ऑस्ट्रेलियांच्यातील कसोटी सामना... स्थळ : इडन गार्डन. आता सारे काही तुमच्या डोळ्यापुढे तरळले असेल. भारताने मिळवलेला तो ऐतिहासिक विजय कुणीही विसरू शकणार नाही. हा सामना म्हटला की साऱ्यांना राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची खेळीही आठवते. पण एक गोष्ट मात्र बऱ्याच जणांना माहिती नसेल. या सामन्यात भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने एक गोष्ट माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला सांगितली होती.
या सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी होती. चेंडू वळत होता. पण ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगली फलंदाजी करत होती. हरभजनच्या चेंडूंवर खेळताना फलंदाजांना थोडी समस्या जाणवत होती. पण त्याला फलंदाजाला बाद करण्यात जास्त यश मिळत नव्हते. त्यावेळी गांगुली सचिनच्या जवळ गेला. गांगुलीला सचिनला गोलंदाजी द्यायची होती. त्यावेळी गांगुली सचिनला म्हणाला की, मला तुला गोलंदाजी द्यायची आहे, पण तुला एकच षटक मिळेल, त्यामध्ये तू गोलंदाजीत कमाल दाखवू शकलास तर ठिक नाहीतर मला पुन्हा तुझ्याकडे चेंडू सुपूर्द करता येणार नाही. पण यानंतर सचिनने तब्बल 11 षटके टाकली, ती कशी, ते बघूया.
सचिनला नेहमीच आव्हान स्वीकारायला आवडते. त्यामुळे त्याने गांगुलीने दिलेले आव्हानही स्वीकारले. आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने अॅडम गिलख्रिस्टचा काटा काढला. सचिनचा चेंडू या खेळपट्टीवर चांगलाच वळत होता. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सचिनच्या गोलंदाजीचा सामना करणे कठिण जात होते. गिलख्रिस्टचा काटा काढल्यावर काही वेळातच सचिनने मॅथ्यू हेडनलाही तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर शेन वार्नला बाद करत सचिनने या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.