मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघावरुन अद्यापही सुरु झालेला वाद संपत नसल्याचे दिसत आहे. रोहित शर्माची न झालेली निवड, लोकेश राहुलला मर्यादित षटकांसाठी दिलेले उपकर्णधारपद, सूर्यकुमार यादवचा न झालेला विचार, अशा अनेक कारणांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका होत आहे. यावर आता माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरनेही टीका केलेली असताना, त्याला प्रत्युत्तर देताना आणखी एका माजी दिग्गज क्रिकेटपटूने म्हटले की, ‘मांजरेकर, मुंबईच्या पलीकडचाही विचार करत जा.’
यंदाच्या आयपीएमध्ये लोकेश राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये ऑरेंज कॅपवरही त्यानेच कब्जा केला आहे. डिसेंबर-जानेवारी दरम्यान रंगणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचा तिन्ही प्रकारच्या संघात समावेश आहे. त्याचप्रमाणे रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे एकदिवसीय व टी-२० क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारीही राहुलकडे सोपविली आहे. मात्र अनेकांना खटकत आहे ती राहुलची कसोटी सामन्यासाठी झालेली निवड. यावरुनच मांजरेकर आणि श्रीकांत यांच्यामध्ये जुंपली आहे.
मांजरेकर यांनी म्हटले होते की, ‘सध्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडण्याची चुकीची परंपरा सुरु झाली आहे. हा निर्णय रणजी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी अत्यंत निराशाजनक ठरणारा आहे.’ यावर श्रीकांत यांनी मांजरेकरचा थेट समाचार घेऊन त्याच्यावर टीका केली आहे.
आपल्या यू-ट्यूब चॅनल ‘चीकी-चीका’ यावरुन श्रीकांत म्हणाले की, ‘प्रश्न विचारणे संजय मांजरेकरचे काम आहे, त्यामुळे ते सोडलेलेच बरे. राहुलच्या कसोटी संघातील निवडीबाबत बोलायचे झाल्यास, त्याने कसोटीत चांगले प्रदर्शन केले आहे. केवळ संजय मांजरेकर प्रश्न निर्माण करतोय म्हणून यावर मी सहमत होणार नाही. तुम्हाला फक्त वाद उद्भवण्यासाठी कोणताही प्रश्न विचारता कामा नये. राहुलने प्रत्येक प्रकारात चांगली कामगिरी केली आहे.’
राहुलने भारताकडून ३६ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ५ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. श्रीकांत यांनी पुढे म्हटले की, ‘मांजरेकर निरर्थक गोष्टी करत आहे. मी यावर सहमत नाही. राहुलच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असू शकतो, पण हा तोच राहुल आहे, ज्याने ऑस्टेलियात कसोटी पदार्पण करत शतक झळकावले होते. संजय मांजरेकर तुम्ही मुंबईपलीकडचा विचार करु शकत नाही. हीच अडचण आहे. आम्ही योग्य बोलतोय. मांजरेकर मुंबईच्या पुढचा विचार करु शकत नाही. मांजरेकर सारख्या लोकांसाठी मुंबईच सर्वकाही असून मुंबई आणि मुंबई. त्यांनी मुंबईच्या पुढील विचार करावा.’
Web Title: You think of Mumbai next; Manjrekar was hit by a former cricketer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.