मुंबई : आयपीएलचा मोसम सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. कारण स्पर्धेपूर्वीच यंदाच्या लिलावात ज्या युवा खेळाडूला आपल्या संघात घेतले, त्या दिग्विजय देशमुखच्या गोलंदाजी शैलीवर शंका घेण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदी येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
यंदाच्या मोसमात मुंबईने काही युवा खेळाडूंना संघात स्थान दिले. मूळचा अंबेजोगाईचा असलेल्या दिग्विजयची शैली अवैध असल्याचे समजले असून, त्याबाबतचा अहवालही सादर करण्यात आला आहे. हा अहवाल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही, पण त्याला महाराष्ट्राच्या रणजी संघातून बाहेर काढण्यात आले आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच त्याच्या बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू दिग्विजय देशमुखने सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत ७ सामन्यांमध्ये ९ बळी मिळविले. त्याचबरोबर, या २१ वर्षीय युवा खेळाडूने जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी करंडकस्पर्धेत पदार्पण केले होते. या सामन्यात आठव्या क्रमांकावर खेळताना त्याने ८१ धावांची शानदार खेळीही साकारली होती.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागबान यांनी याबाबत सांगितले की, ‘गेल्या सामन्यात दिग्विजयची गोलंदाजी शैली अवैध असल्याचे आम्हाला सांगण्यात आले, तसेच या प्रकरणाचा अहवालही आम्हाला मिळाला आहे. हा अहवाल आम्ही संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना पाठविला आहे. दिग्विजयला आता निलंबित करण्यात आलेले नाही, पण त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे.’ दरम्यान, आता दिग्विजयला एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये पाठविण्यात येणार असून, तेथे त्याच्या गोलंदाजी शैलीची समीक्षा करून त्यातील चुका सुधारण्यात येतील.