दुबई :भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना फार कमी वेळा राग येतो, असा अनुभव आहे. गावसकर हास्य विनोदात रमणारे व्यक्तिमत्त्व आहे. पण, मंगळवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉची बाद होण्याची पद्धत त्यांना आवडली नाही. या लढतीच्या वेळी समालोचन करीत असलेल्या गावसकर यांनी पृथ्वीच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला. खराब फटका खेळून बाद होणाऱ्या पृथ्वी शॉवर त्यांनी टीका केली. त्याच्यात मानसिक कणखरता नसल्याचे गावसकर म्हणाले.
आकाश चोपडाच्या साथीने समालोचन करणारे गावसकर म्हणाले, ‘मला या खेळाडूची मानसिकता व्यवस्थित वाटते? नाही. खेळाडू मानसिकदृष्ट्या कणखर नाही, तुम्हाला काय वाटते? अशा प्रकारे विकेट बहाल करण्याची गरज काय होती? अशा वेळी असे फटके खेळण्याला काही अर्थ नाही. अखेर तो काय करू इच्छित होता? जर हा चेंडू लॉगऑनच्या वरून गेला असता तर षटकार झाला असता, त्यावेळी लोकांनी त्याची प्रशंसा केली होती. त्याला काय एवढीच अपेक्षा होती.’
गावसकर यांची टीका बोचरी असली तरी त्यांची खेळाबाबतची प्रतिबद्धता सिद्ध करणारी आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराने आपल्या शानदार कारकिर्दीत नेहमी फलंदाजीच्या मूळ तत्त्वांचे पालन केले आहे. नव्या पिढीकडूनही त्यांना तशीच अपेक्षा असेल तर त्यात काय चुकीचे आहे?