बंगळुरु - भारतीय क्रिकेट संघाची मैदानावरील आक्रमकता आजच्या तरुण क्रिकेटप्रेमींना भावतेय. पण भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचे मत बिलकुल याउलट आहे. ज्या खेळाडूंच्या दंडावर टॅटू नसतो ते सुद्धा तुम्हाला सामना जिंकून देतात. शेवटी खेळामध्ये परफॉर्मन्सच महत्वाचा असतो असे मतराहुल द्रविडने व्यक्त केले. बंगळुरुमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात राहुल द्रविड बोलत होता. संमेलनातील एका सत्रामध्ये प्रेम पानीकर आणि राजदीप सरदेसाई यांनी राहुल द्रविडची मुलाखत घेतली.
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा स्वभाव, वर्तन यावरही राहुल द्रविडने भाष्य केले. अनेकदा विराट मालिका सुरु होण्याआधी अवाजवी बोलतो असे मला वाटते. त्याच्या विधानांची मला भिती वाटते पण प्रतिस्पर्ध्यावर शाब्दीक कुरघोडी करुन तो सर्वोत्तम प्रदर्शन करत असेल तर काही हरकत नाही असे द्रविड म्हणाला. आक्रमक भाषेसाठी तुम्ही विराटला जबाबदार धरु शकत नाही. कारण बोलल्यानंतरही तो चांगली कामगिरी करु शकतो. पण इतरांना हेच तत्व लागू पडत नाही. आज अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटू स्वत:ची क्षमता समजून घेतल्याशिवाय विराटच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत ज्याची मला सर्वात जास्त भीती वाटते असे राहुल द्रविड म्हणाला.
मी क्रिकेट खेळताना विराटसारखा का वागलो नाही ? असा प्रश्न मला अनेकजण विचारतात पण मी विराटसारखे वागणे म्हणजे ती स्वत:चीच फसवणूक ठरली असती असे राहुल द्रविड म्हणाला. संमेलनातील राहुल द्रविडच्या या सत्राला संपूर्ण सभागृह खच्चून भरले होते.
अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदावरुन हटवण्यासंबंधीही राहुल द्रविडने महत्वपूर्ण भाष्य केले. हा संपूर्ण वाद मीडियामध्ये चालला हे दुर्देव आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनिल कुंबळे इतके कसोटी सामने अन्य कुठल्याही खेळाडूने जिंकून दिलेले नाहीत. तो खरोखरच महान क्रिकेटपटू आहे. कोचपेक्षा खेळाडू जास्त ताकतवान आहे. आमच्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती. कोचला काढून टाकण्यात येते हे सत्य आहे. मी इंडिया ए आणि अंडर-19 संघाचा प्रशिक्षक आहे. मला सुद्धा एकदिवस कोचपदावरुन हटवण्यात येईल फक्त ही प्रक्रिया योग्यरित्या पार पाडूं दे एवढेच म्हणणे आहे असे राहुल द्रविड म्हणाला.