Join us  

IND vs ENG: "जेव्हा बाबांना सांगितलं तेव्हा...", युवा ध्रुवला भारतीय संघात संधी; सांगितला भावनिक क्षण

IND vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून युवा ध्रुव जुरेलला संधी मिळाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 7:40 PM

Open in App

Dhruv jurel Emotional:  इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघ आगामी काळात मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा झाली. युवा खेळाडू ध्रुव जुरेलला आगामी मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर ध्रुव जुरेलने एक भावनिक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, माझ्या मित्रांनी मला सांगितलं की, इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी तुझी निवड झाली आहे. तेव्हा माझा आनंद गगनात न मावणारा होता. भारत अ संघाकडून मी चांगली कामगिरी केली होती. याशिवाय सराव सामन्यांमध्येही प्रभावी कामगिरी करता आली. यष्टीरक्षक असल्याने फलंदाजी आणि हे देखील काम चांगल्या पद्धतीने जमले अन् त्याचे फळ आज मिळते आहे. पण, निवडीबाबत मी विचारही केला नव्हता.

तसेच मी केवळ माझ्या खेळीवर लक्ष केंद्रीत केलं. बाबांना याबद्दल सांगितलं तेव्हा ते खूप खुश झाले आणि विचारलं की कोणत्या भारतीय संघात निवड झाली आहे. हा क्षण माझ्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी खूप भावनिक होता, असेही ध्रुवने सांगितलं. तो 'टाइम्स नाउ'शी बोलत होता.

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.

युवा खेळाडूला संधीभारतीय संघात युवा ध्रुव जुरेलला स्थान मिळाले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. २३ वर्षीय ध्रुव १९ वर्षाखालील भारत अ संघाकडून खेळला आहे. त्याचा देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे. ध्रुवने १५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये ७९० धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. यासोबतच ध्रुवने इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील कमाल दाखवली आहे.

अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाचा हिस्सा नसलेल्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून एन्ट्री होणार आहे. ट्वेंटी-२० मालिकेतून दोघांनाही ब्रेक देण्यात आला आहे. आवेश खान आणि मुकेश कुमार यांना संघात जागा मिळवण्यात यश आले आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही टीम इंडियात समावेश आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे अष्टपैलू खेळाडूही इंग्लंडविरुद्ध टीम इंडियात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. मात्र इशान किशनला संधी देण्यात आलेली नाही. इशानबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले होते की, इशानने बीसीसीआयकडे सुटी मागितली आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघप्रेरणादायक गोष्टी