श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सीरिजमध्ये भारतीय संघाची सुरुवात विजयानं झाली. पण दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. युवा खेळाडू संजू सॅमसन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे.
संजू सॅमसनच्या गुडघ्याला सूज आली आहे आणि तो पुढील चाचणीसाठी मुंबईतच आहे. थर्ड-मॅन रीजनमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना सॅमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने आज दुपारी त्याला स्कॅन आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत नेलं होतं. यात वैद्यकीय सल्ल्यानुसार सॅमसन विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्यानंतर संजू सॅमसनने प्रतिक्रिया दिली आहे. ''All is well…Z u Zoooon'', असं संजू सॅमसनने म्हटलं आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात टी२० मालिका सुरु आहे. या टी२० मालिकेत भारत १-० च्या आघाडीवर आहे. पहिला सामना २ धावांनी जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेऊ शकतो. आजचा हा दुसरा टी२० सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.