युवा खेळाडूंनी लक्ष वेधले

कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांदरम्यान झालेल्या सामन्यात काही रोमांचक गोष्टी घडल्या. एक म्हणजे या सामन्यात चेन्नईची विजयी मालिका खंडित झाली. या वेळी चेन्नईच्या सांघिक कामगिरीत कमतरता दिसली. फलंदाजीत पहिल्या १० षटकांत ९० धावा फटकावल्यानंतर २००च्या आसपास मजल मारायला पाहिजे होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:16 AM2018-05-05T02:16:10+5:302018-05-05T02:16:10+5:30

whatsapp join usJoin us
 Young players In IPL | युवा खेळाडूंनी लक्ष वेधले

युवा खेळाडूंनी लक्ष वेधले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)

कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांदरम्यान झालेल्या सामन्यात काही रोमांचक गोष्टी घडल्या. एक म्हणजे या सामन्यात चेन्नईची विजयी मालिका खंडित झाली. या वेळी चेन्नईच्या सांघिक कामगिरीत कमतरता दिसली. फलंदाजीत पहिल्या १० षटकांत ९० धावा फटकावल्यानंतर २००च्या आसपास मजल मारायला पाहिजे होती; पण १७७ धावांवर त्यांना समाधान मानावे लागले. शिवाय यानंतर क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडले. गोलंदाजीही सुमार होती, विशेष करून डेथ ओव्हर्समध्ये त्यांनी मोठी निराशा केली. या विजयासह कोलकातावर प्ले आॅफ गाठण्यासाठी असलेले दडपण काही प्रमाणात दूर झाले आहे. पण या सामन्यातील सर्वांत मोठी आणि लक्षवेधी बाब होती ती म्हणजे शुभमान गिलची दमदार खेळी. काही महिन्यांपूर्वी झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला होता. जेव्हा कोलकाताने त्याला विकत घेतले, तेव्हा अनेकांनी त्याच्या खेळीवर शंका व्यक्त केली होती. शिवाय याआधी सहाव्या - सातव्या क्रमांकांवर खेळताना त्याने विशेष कामगिरी केली नव्हती. मात्र, चेन्नईविरुद्ध त्याने जी खेळी केली त्याने सर्वांचे डोळे उघडले आहेत. त्याने या खेळीच्या जोरावर सर्वांच्या शंका दूर केल्या. टी२० क्रिकेटमध्येही पारंपरिक क्रिकेट फटके मारता येतात, जे आपल्याला याआधी केन विलियम्सनच्या खेळीतून दिसून आले. अशाच प्रकारची खेळी गिलनेही केली हे विशेष. अचूक तंत्रासह खेळल्यास तुम्ही चौकार व षटकार मारूशकता, हे गिलने दाखवून दिले.
एकीकडे युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत असताना दुसरीकडे ज्यांच्यासाठी मोठी रक्कम मोजली गेली, असे दिग्गज खेळाडू मात्र अपयशी ठरले आहेत. यामध्ये बेन स्टोक्स ज्याला साडेबारा करोड रुपयांची किंमत मिळाली, पण एकाही सामन्यात त्याने छाप पाडली नाही. ग्लेन मॅक्सवेलला दिल्लीला ९ करोडमध्ये खरेदी केले. त्यानेही अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी केली नसली, तरी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे अजूनही संधी आहे. जयदेव उनाडकट या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला राजस्थानने ११.५ करोडमध्ये विकत घेतले होते. त्याच्याकडूनही विशेष कामगिरी अद्याप झालेली नाही. मनिष पांडेही (११ करोड) हैदराबादकडून फारशी छाप पाडू शकलेला नाही. चेन्नईचा रवींद्र जडेजा (७ करोड) अजूनही झगडताना दिसत आहे. आतापर्यंत सगळे सामने खेळूनही बळींची संख्या वाढली नाही. आयपीएलमधील दमदार कामगिरी पाहूनच त्याची भारतीय संघात वर्णी लागली होती. पण या मोसमात तो अपयशी ठरला. या सर्व दिग्गज खेळाडूंना लिलावामध्ये मोठी रक्कम मिळाली होती, पण काही कारणास्तव त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. त्यामुळे मला वाटते की, येणाºया मोसमातील लिलावामध्ये फ्रेंचाइजी मालकांनी नामांकित खेळाडू पाहून बोली लावू नये किंवा इतकी मोठी रक्कम देऊ नये. मोठी रक्कम देऊनही अपेक्षित कामगिरी न झाल्यास संघ अडचणीत येतो. स्टोक्स, मॅक्सवेल यांसारख्यांना तुम्ही बसवूही शकत नाही. त्यामुळे फ्रेंचाइजींची येणाºया काळात मोठी कसोटी लागेल.

गिलशिवाय अनेक युवा खेळाडूही आपली छाप पाडत आहेत. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर हे दिल्लीकर, राजस्थानचा संजू सॅमसन, कोलकाताचा शुभम मावी, मुंबईचा मयांक मार्कं डे असे अनेक युवा खेळाडू आपली छाप पाडत आहेत. एकूणच आयपीएलच्या माध्यमातून भारतातील युवा गुणवत्ता समोर येत असून या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघासाठी खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे भारतीय क्रिकेटसाठी खूप फायदेशीर आहे असे मला वाटते.
 

Web Title:  Young players In IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.