मागच्या एक नोव्हेंबरनंतर भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळविला. यामुळे इंग्लंडविरुद्ध क्लीन स्विपची भारताला आता संधी असेल. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर संघ व्यवस्थापनाने दाखविलेला विश्वास ही देखील चांगली बाब ठरली आहे.अनेक पर्याय उपलब्ध असताना एखाद्या अनुभवी खेळाडूला बाहेर ठेवता आले असते; मात्र दोन्ही मातब्बर खेळाडूंना संधी देणे हा त्यांना देण्यात आलेला मोठा पुरस्कार ठरला. धवनने सुरुवातीच्या संयमानंतर खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेतला तर राहुलने स्वत:च्या शैलीत फटकेबाजी केली.
मार्क वूड आणि सॅम कुरेन या वेगवान गोलंदाजांविरुद्ध रोहित आणि धवन यांची फलंदाजी दमदार जाणवली. रोहित बाद झाल्यानंतर विराटने परिस्थिती ओळखून धवनला फटकेबाजीची संधी दिली. भारत मोठा धावडोंंगर उभारेल, असे जाणवत असताना धवन शतक पूर्ण करण्याआधी बाद झाला.
एकूण चार फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे राहुलच्या वेगवान धावांचा लाभ होईल का, अशी शंका उपस्थित झाली होती. तथापि, राहुलच्या खेळीपासून प्रेरणा घेत कृणाल पांड्याने पदार्पणात धडाका केला. त्याच्या या खेळीत स्थानिक क्रिकेटमधील आत्मविश्वास जाणवला. राहुलच्या सोबतीने कृणालने वेगवान अर्धशतकही गाठले. ‘डेथ ओव्हर’मध्ये दोघांनी इंग्लंडचा वेगवान मारा चांगलाच फोडून काढला. यामुळे ३०० वर धावांचा टप्पा गाठणे शक्य झाले.
३१७ धावांचे लक्ष्य गाठताना बेयरेस्टॉ- जेसन रॉय यांनी पहिल्या दहा षटकात भारतीय खेळाडूंच्या तोंडचे पाणी पळविले होते. भुवनेश्वर वगळता अन्य गोलंदाजांना काहीही सुचेनासे झाले होते. सीमारेषाही जवळ वाटत होती. त्याचवेळी पहिल्या स्पेलमध्ये ३७ धावा मोजणारा नवखा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुसऱ्या स्पेलमध्ये अधिक मुरब्बी आणि भेदक वाटला. प्रसिद्धने जेसन रॉयचा अडथळा दूर करताच भारताने इंग्लंडवर वर्चस्व गाजविले. नवोदित गोलंदाजांचा निर्धार मला फार आवडला. इंग्लंडवर त्यांनी सातत्याने आघात केला.
बेन स्टोक्सला प्रसिद्धने टिपल्यानंतर शार्दुल ठाकूरने सहा धावा देत पुढचे तीन फलंदाज बाद केले. यामुळे आवश्यक धावांची सरासरीही इंग्लंडच्या आवाक्याबाहेर गेली होती. भारताच्या युवा खेळाडूंनी संधीचा पुरेपूर लाभ घेत सामना जिंकून दिला, असे म्हणायला हरकत नाही. आता अय्यर संघात नसणार. दुखापतीमुळे तो मालिकेला मुकला. अशावेळी सूर्यकुमार किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकला संधी मिळायला हवी. दोन्ही खेळाडू फटकेबाजीच्या जोरावर सामना जिंकून देण्याची क्षमता बाळगतात. (गेमप्लान)