जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येत असलेल्या एका स्थानिक स्पर्धेमध्ये एका युवा फिरकीपटूने कमाल केली आहे. चार दिवसीय सामन्यामध्ये फिरकीपटू शॉन व्हाईटहेडने एका डावात सर्वच्या सर्व दहा विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत फ्रेंचाईज सिरीज या स्पर्धेत केली आहे.
साऊथ-वेस्टर्न डिस्ट्रिक्टकडून खेळताना डावखुरा फिरकीपटू शॉन याने ३६ धावा देऊन १० विकेट्स घेतले. त्यादरम्यान त्याने १२ षटके टाकली. शॉन व्हाईटहेडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर साऊथ-वेस्टर्न डिस्ट्रिक्टने ईस्टर्नच्या संघाला केवळ ६५ धावांत गुंडाळले.शॉन व्हाईटहेडने आपल्या गोलंदाजीदरम्यान २ फलंदाजांचा त्रिफळा उडवला. तर तीन फलंदाजांना पायचित केले. उर्वरित पाच फलंदाज झेलबाद झाले. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासाचा विचार केल्यास कुठल्याही गोलंदाजाने एका डावात केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
शॉन व्हाइटहेडने संपूर्ण सामन्यात एकूण १५ विकेट्स घेतले. त्याने पहिल्या डावात ६४ धावात ६४ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर दोन्ही डावात त्याने ६६, ४५ धावांची खेळीसुद्धा केली. या सामन्यातील कामगिरीमुळे त्याची एकूण सरासरीही सुधारली आहे. आता १३ सामन्यांमध्ये व्हाईटहेडच्या नावावर ३९ बळींची नोंद आहे.
१९०६ मध्ये लेग स्पिनर बर्ट वॉगलर यांनी २६ धावा देत १० बळी टिपले होते. त्यांनी ईस्टन्स प्रोव्हिन्स संघाकडून खेळताना अशी कामगिरी केली होती. तर शॉन व्हाईटहेडने ३६ धावा देऊन दहा बळी टिपले आहेत. दक्षिण आफ्रिका क्रिकेटकडून ट्विटरवर या सामन्याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा विचार केल्यास १९३२ मध्ये यॉर्कशायरच्या एच. व्हेरिटी यांनी केवळ १० धावा देऊन दहा बळी टिपले होते.