मुंबई : कठोर विलगीकरणादरम्यान आपल्या फिटनेसवर मेहनत घेत असलेली भारतीय क्रिकेटची ‘युथ ब्रिगेड’ १३ जुलैपासून प्रारंभ होत असलेल्या श्रीलंका दौऱ्यात छाप सोडण्यास उत्सुक आहे. प्रथमच देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या या युवा खेळाडूंसाठी स्वप्न साकार होण्यासारखे आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंचा १४ जूनपासून सुरू झालेला विलगीकरण कालावधी २८ जूनपर्यंत राहील.
डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने बीसीसीआय टीव्हीसोबत बोलताना सांगितले,‘आता प्रत्येकाला विलगीकरणाची सवय झाली आहे. विलगीकरणातून बाहेर पडत अन्य खेळाडूंना भेटणे आणि व्यायाम करणे चांगले वाटत आहे. मला सकारात्मक वाटत आहे.’
प्रथमच भारतीय संघात संधी मिळालेला सौराष्ट्रचा हा खेळाडू म्हणाला,‘ज्यावेळी मी रुमच्या बाहेर पडलो त्यावेळी मी बराचवेळ स्वत:ला बघत होतो.
टीम इंडियाची जर्सी घालून चांगले वाटले. जिममध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे वर्कआऊट केले.’दिल्लीचा आघाडीचा फलंदाज नितीश राणा म्हणाला,‘पहिले सात दिवस माझ्यासाठी कठीण होते आणि मी माझ्या सहकाऱ्यांना भेटण्याची प्रतीक्षा करीत होतो. जर्सी घालण्याची प्रतीक्षा करीत होते. प्रत्येक तास वर्षाप्रमाणे भासत होता.’राणा पुढे म्हणाला,‘येथील माहोल सकारात्मक आहे. मालिकेसाठी आम्ही उत्सुक आहोत. नव्या ट्रेनरकडून मी बरेच काही शिकलो.’ राणा व सकारिया यांच्याप्रमाणे प्रथमच भारतीय संघात संधी मिळालेले कर्नाटकचे देवदत्त पडिक्कल व कृष्णप्पा गौतम यांनीही हेच सांगितले.
महाराष्ट्राच्या रितुराज गायकवाडने संघात निवड होणे म्हणजे स्वप्न साकार झाल्यासारखे असल्याचे म्हटले आहे. त्याने सांगितले,‘आम्ही एवढे वर्षे याची प्रतीक्षा करीत होतो. त्यासाठी कसून मेहनत घेत होतो आणि स्वप्न साकार झाल्यामुळे आनंद वाटत आहे.’ भारतीय संघ श्रीलंकेत तीन वन-डे व तीन टी-२० सामने खेळेल.
गौतम म्हणाला,‘आम्ही कर्नाटकतर्फे खेळतो आणि एकमेकांची शक्तीस्थळे व कमकुवत बाजू आम्हाला माहीत आहेत. पडिक्कलसोबत सराव करताना चांगले वाटले, पण माझ्या मते त्याने आपले वजन वाढवायला हवे.’
पडिक्कल म्हणाला, ‘विलगीकरणातही आम्ही रूममध्ये शक्य तसा सराव करीत होतो. जिममध्ये सरावाची बाबच वेगळी असते. आता आम्हाला चांगले वाटत आहे.’
Web Title: Youth Brigade ready to make an impression; Sri Lanka will play three ODIs and three T20I matches from July 13
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.