जोहान्सबर्ग : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दारुण पराभवाच्या कटू स्मृती विसरून लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रविवारी नव्या जोमाने उतरणार आहे.
टी-२० विश्वचषक सहा महिन्यांनंतर होणार असल्याने वनडे मालिकेची प्रासंगिकता काय, असा प्रश्न उपस्थित होतो. पण २०२५च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने उभय संघांकडे नव्या चेहऱ्यांना वाव देण्याची उत्कृष्ट संधी असेल.
विराट आणि रोहित यांनी दीड दशकात या दोन्ही प्रकारात कामगिरीचा अमिट ठसा उमटविला. दोघांचीही कारकीर्द मावळतीला असल्याने त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी युवा खेळाडूंवर असेल. अशावेळी सर्वाधिक लक्ष असेल ते कर्णधार लोकेश राहुल याच्यावर. त्याने आधीही नेतृत्व केले; पण या मालिकेत यशस्वी झाल्यास दीर्घकाळासाठी राहुलकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपविले जाऊ शकते.
ऋतुराज, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग हे सर्वजण भावी संघाचा कणा ठरू शकतात. रजत पाटीदारलादेखील आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. साई सुदर्शन आणि तिलक वर्मा मधली फळी सांभाळण्यास सज्ज आहेत. या सर्वांनी कॅगिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्खियाच्या अनुपस्थितीत एडेन मार्करामच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांपुढे देदीप्यमान कामगिरी करावी, अशी बीसीसीआयला अपेक्षा असेल.
भारतीय संघ जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद शमी यांच्याविना खेळणार आहे. अशावेळी आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्यावर जबाबदारी असेल.