सिडनी : युवा विश्वचषक (१९-वर्षांखीलील) स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियापुढे २३४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव १५९ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने ७४ धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार अर्धशतके लगावली. या दोघांच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियापुढे २३४ धावांचे आव्हान ठेवता आले.
भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या महत्वाच्या चार फलंदाजांना त्यागीने माघारी धाडले. त्यागीच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले गेले आणि या धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला हा सामना गमवावा लागला.
युवा विश्वचषक (१९-वर्षांखीलील) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार अर्धशतके लगावली. या दोघांच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियापुढे २३४ धावांचे आव्हान ठेवता आले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताचे पहिले तीन फलंदाज ५४ धावांत माघारी परतले होते. पण त्यावेळी एका बाजूने यशस्वी दमदार फलंदाजी करत होता. यशस्वीने सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली.
यशस्वी बाद झाल्यावर अथर्वने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अथर्वने अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्याता मोलाचा वाटा उचलला. अथर्वने पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच भारताला २३३ धावा करता आल्या.