मुंबई - माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीने बुधवारी रात्री यूएईमध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला. त्यामध्ये, आयपीएलमध्ये प्रभावी प्रदर्शन केल्यानंतरही अनुभवी शिखर धवन आणि युवा पृथ्वी शॉ या फलंदाजांना विश्वचषक स्पर्धेत डावलण्यात आले. तर, युवक फिरकीपटू यजुवेंद्र चहलाला राखीव जागेतही स्थान मिळाले नसून संघातून 'आऊट' करण्यात आले. त्यानंतर, चहलच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.
फिरकीपटू यजुवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी तिचे खास फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत असते. आता, तिने पती यजुवेंद्र चहलचे भारतीय टी-20 विश्वचषक स्पर्धेतील संघात स्थान निश्चित न झाल्याने नाराजी दर्शवली आहे.
धनश्रीने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून मनातील खंत बोलून दाखवली आहे. आई म्हणते की, ही वेळही निघून जाईल. ताठ मानेनं जगलं पाहिजे, कारण तुमचं टॅलेंट आणि चांगले कर्म कायम साथ देतात. ही वेळ निघून जाईल. गॉड इज ऑलवेज ग्रेट...! असे धनश्रीने म्हटले आहे. दरम्यान, आता धनश्री आणि चहल हे युएईला रवाना झाले असून ते आयपीएल स्पर्धेत सहभागी होतील.
चहलची कामगिरी उत्तम
चहल टी-20 क्रिकेट स्पर्धत आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 49 सामन्यांत 25.30 च्या सरासरीने 8.32 च्या इकॉनॉमी रेटने 63 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, तरीही टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात त्याची निवड झाली नाही. त्यामुळे, चहलच्या पत्नीसह त्याचे चाहतेही निराश झाले आहेत.
धोनीच्या अनुभवाचा संघाला फायदा
भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर लक्षवेधी निवड ठरली ती माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची. खेळाडू म्हणून नाही, तर संघाचा मार्गदर्शक म्हणून धोनी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघासोबत जाईल. यूएई व ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगेल. बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले की, ‘या स्पर्धेसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शन (मेंटॉर) असेल. मी त्याच्याशी दुबईत चर्चा केली होती. त्याने केवळ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी मार्गदर्शक राहण्यास सहमती दर्शवली. याबाबत कर्णधार व उपकर्णधारांनीही सहमती दर्शवली आहे.’