लंडन : इंग्लंडशी निगडीत भारताच्या बऱ्याच चांगल्या आठवणी आहेत. इंग्लंडमध्येच भारताने पहिला विश्वचषक जिंकला होता. भारताने इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी भारताला नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकवून दिली होती, ही गोष्ट अजूनही भारतीयांच्या स्मरणात आहे. या गोष्टीला बरीच वर्ष झाली असली तरी युवराज आणि कैफ इंग्लंडच्या माजी कर्णधाराला अजूनही स्व्प्नात येऊन छळत आहे. दस्तुरखुद्द इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने आपल्या एका ट्विटमधून ही गोष्ट सांगितली आहे.
नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकून भारताला 17 वर्षे झाली आहेत. कैफने निवृत्ती घेतली आहे, तर दुसरीकडे युवराजही संघात नाही. पण विश्वचषक इंग्लंडमध्ये आहे आणि त्यासाठी समालोचन करण्यासाठी युवराज आणि कैफ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. कैफने याबाबत एक ट्विट पोस्ट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये कैफ म्हणाला की, " लॉर्ड्सवर 17 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. नॅटवेस्ट ट्रॉफी आम्ही या मैदानातच 17 वर्षांपूर्वी जिंकली होती. भारतीय संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा."
हुसेन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "" इंग्लंडचा संघ नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पराभूत झाला होता. ही गोष्ट मी अजूनही विसरू शकलेलो नाही. या सामन्यात युवराज आणि कैफ यांनी चांगली फलंदाजी केली होती. अजूनही ही गोष्ट माझ्या स्वप्नात येते आणि मला छळते.