मुंबई : युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली. मुंबईत एका कार्यक्रमात ही घोषणा करताना युवराजचे डोळे पाणावलेले होते. युवराज हा भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार होता. त्याने 2012मध्ये अखेरची कसोटी, तर 2017मध्ये अखेरच्या मर्यादित षटकांचा सामना खेळला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता. 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. त्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,''युवराजनं काल बीसीसीआयला पत्र लिहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला जगभरातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यास काहीच हरकत नाही." भारतीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची बीसीसीआयकडून परवानगी नाही. त्यामुळे परदेशी लीगमध्ये खेळता यावं, यासाठी युवराजनं निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्याआधी वीरेंद्र सेहवाग व झहीर खान यांनी निवृत्तीनंतर संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या टी-10 लीगमध्ये सहभाग घेतला होता.
निवृत्ती जाहीर करताना युवराज म्हणाला होता की,'' ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये खेळण्याची माझी इच्छा आहे. या वयात मनोरंजनासाठी मी क्रिकेट खेळू शकतो. आता मला आयुष्याचा आनंद लुटायचा आहे."
युवराजने निवडले अंतिम चार; भारताला 'हा' संघ करणार बेजार!आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेल्या युवराज सिंगने वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे अंतिम चार संघ निवडले आहेत. त्याच्या या संघांत भारत आणि इंग्लंड यांचे स्थान पक्कं आहे, परंतु तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी तीन संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल, असे मत युवीनं व्यक्त केलं. तो म्हणाला,'' वर्ल्ड कप स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे संघ अंतिम चारमध्ये स्थान पटकावतील, तर चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड/वेस्ट इंडिज यांच्यात चढाओढ पाहायला मिळेल. पाकिस्ताननं यजमान इंग्लंडला नमवलं आहे, त्यामुळे त्यांचा काही नेम नाही. ही स्पर्धा अधिक रंजक होणार आहे. भारताला यजमान इंग्लंडकडून कडवी टक्कर मिळू शकते.