Yuvraj Singh Biopic Announced : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग हा प्रेरणादायी व्यक्तीमत्वांपैकी एक आहे. आता त्याच्या आयुष्याचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. सिक्सर किंग युवीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या X अकाउंटच्या माध्यमातून फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
कोण असेल युवीच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचा निर्माता?
तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटो पोस्टमध्ये युवराज सिंगची झलकही पाहायला मिळते. भूषण कुमार-रवि भगचांदका युवीच्या बायोपिकचे निर्माते असतील, असा उल्लेखही या पोस्टमध्ये केल्याचे दिसून येते. आता युवीची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्नही त्याच्या चाहत्यांना पडला आहे. पण यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. कारण अद्याप स्टार कास्टसंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिी जाहीर करण्यात आलेली नाही.
युवराज सिंग अन् त्याचे भारतीय क्रिकेटमधील योगदान
युवराज सिंग हे क्रिकेट जगतातील लोकप्रिय नाव आहे. २००७ मधील टी-२० वर्ल्ड कपसह २०११ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला चॅम्पियन करण्यात युवीनं मोलाचा वाटा उचलला होता. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ४० कसोटी सामने खेळले आहेत. यात ३ शतकासह ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ३०४ वनडे सामन्यात त्याने १४ शतकासह ५२ अर्धशतकासह ८७०१ धावा केल्या आहेत. ५८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात ११७७ धावांची नोंद आहे.
लढवय्या खेळाडू! युवराज सिंग हा मैदानातील आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मात देण्यात तरबेज होताच. याशिवाय आयुष्याची लढाई लढण्याची त्याची जिद्द आणि ताकद ही त्याला सलाम करायला लावणारी होती. कर्करोगावर मात करून या खेळाडूनं क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
आता सचिन-धोनीच्या क्लबमध्ये सामील होणार युवी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांच्यासंदर्भातील खास स्टोरी याआधी चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज आणि झुलन गोस्वामी हे क्रिकेटमधील चेहरे देखील चित्रपटामुळे चर्चेत राहिले आहेत. आता या पक्तींत युवीचाही समावेश झाला आहे. चित्रपटाचे नाव काय असेल? त्याच्या भूमिकेला न्याय देणारा चेहरा कोण असेल? ते पाहण्याजोगे असेल.