भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असल्याचे दिसून येते. आता पुन्हा त्यांनी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर भारतीय संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्यावरही त्यांनी राग व्यक्त केला आहे.
धोनीच्या चुकीला माफी नाही
महेंद्रसिंह धोनी याने लेकाचं अर्थात युवराज सिंगचे करिअर उद्धवस्त केले, असा आरोप याआधीही योगराज सिंग यांनी केला आहे. पुन्हा ही गोष्ट बोलून दाखवत धोनीला कधीही माफ करणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. जे सध्या चांगलेच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आपल्या मनातील धोनीवरील राग व्यक्त केला.
पुन्हा धोनीवर राग; आता नेमकं काय म्हणाले योगराज सिंग
मी धोनीला कधीच माफ करणार नाही. धोनीनं स्वत:चा चेहरा आरशा पाहावा. तो एक मोठा क्रिकेटर आहे. पण त्याने युवराज सिंगसोबत केलं त्याबद्दल त्याला कधीच माफ करू शकत नाही. त्याच्यासोबत जो चुकीचा वागतो त्याला मी कधीच माफ करत नाही. मग तो घरचा असो नाहीतर बाहेरचा. धोनीनं युवराजच आयुष्य उद्धवस्त केले. तो आणखी चार पाच वर्षे सहज खेळला असता. त्याच्यासारखा खेळाडूला जन्म देणं सोप नाही.
युवीचे आकडे त्याच्या वडीलांना धोनीला माफ करायला लावणारे!
योगराज सिंग हे आपल्या मुलाचे अर्थात युवराज सिंगचे करिअर संपवण्यामागे धोनीला जबाबदार धरत असले तरी आकडे मात्र काही वेगळेच सांगतात. कारण धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये युवराज सिंग वर्ल्ड चॅम्पियन झालाय. २००७ मध्ये टी-२० आणि २०११ वनडे वर्ल्ड विजेत्या संघाचा तो भाग होता. या दोन्ही स्पर्धेवळी धोनीच टीम इंडियाचा कॅप्टन होता. युवराज सिंगने टीम इंडियाला चॅम्पियन करण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
कपिल पाजींवरही काढला राग
आपल्या नव्या मुलाखतीमध्ये योगराज सिंग याने १९८३ मध्ये भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल पाजींवरही राग काढला आहे. १९८१ मध्ये भारतीय संघातून बाहेर काढल्यापासून कपिल देव यांच्यासोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत, असे ते म्हणाले आहेत. कपिल देव यांच्या तोडीस तोड असल्यामुळेच संघाबाहेर काढले, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या लेकानं १३ ट्रॉफी जिंकल्या असे म्हणत युवराज सिंगचा दाखला देत त्यांनी कपिल पाजींना टोला हाणला आहे. एवढेच नाही तर युवराज सिंगला भारत रत्र मिळायला हवा, असे वक्तव्यही त्यांनी केले.
Web Title: Yuvraj Singh Deserves Bharat Ratna MS Dhoni 'ruined' his career Also Yograj Singh Target On Kapil Dev
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.