मुंबई : 2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आठवला ही समोर राहतो तो युवराज सिंगच्या एका षटकात सहा षटकारांचा प्रसंग. इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा रडायचा बाकी होता. पण, ब्रॉडच्या या दयनीय अवस्थेला इंग्लंडचा ॲंड्य्रू फ्लिंटॉफ जबाबदार असल्याचे गुपीत युवराजने सांगितले. फ्लिंटॉफने मला डिवचले नसते, तर कदाचित ब्रॉडची अशी धुलाई झाली नसती, असे युवी म्हणाला. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात तो बोलत होता.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यात फ्लिंटॉफने युवराजला डिवचले. त्यामुळे युवीला हे सहन झाले नाही. तो फ्लिंटॉफशी भिडायला गेला. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीही तिथेच होता. पण धोनीने त्याला त्यावेळी रोखले नाही. तो फ्लिंटॉफशी मैदानात दोन हात करणार, असे दिसत होते. हातात बॅट घेऊन तो फ्लिंटॉफच्या दिशेने जायला लागला. पण मैदानावरील पंचांनी युवराजला रोखले. युवराजनेही क्रिकेट या खेळाचा सन्मान ठेवला. तो माघारी फिरला. हा राग त्याने ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा षटकार ठोकून काढला. यावेळी युवराजने ११ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या होत्या.
युवी म्हणाला,"सामन्यात केवळ तीन षटकं शिल्लक असताना मी मैदानावर आलो. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्यापलीकडे मला पर्याय नव्हता. त्यात फ्लिंटॉफने मला डिवचले. त्याच्या त्या कृत्याने मी चवताळलो आणि राग ब्रॉडवर काढला."