दुबई, दि. 16 - राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज युवराज सिंगचं कौतुक करताना युवराज सिंग म्हणजे भारतीय संघाला मिळालेलं गॉड गिफ्ट असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र 2019 वर्ल्ड कप खेळायचा असेल तर युवराज सिंगसाठी फिटनेस तितकाच महत्वाचा आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. युवराज सिंह भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.
श्रीलंका दौ-यातून वगळण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणा-या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेसाठीही युवराज सिंगचा विचार केला गेलेला नाही. उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. मात्र तरीही संदीप पाटील युवराज सिंगच्या पुनरागमनाबाबत सकारात्मक आहेत. युवराज सिंगच्या भविष्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा संदीप पाटील यांनी सर्व काही फिटनेस आणि फॉर्मवर अवलंबून असल्याचं सांगितलं.
संदीप पाटील यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'मी आता सिलेक्टरच्या भूमिकेत नाही आहे. दोन वर्ष हा खूप मोठा वेळ आहे, आणि ज्याप्रकारच्या जखमा झाल्या आहेत त्यानंतर एका खेळाडूवर येणारा भार हा खूप मोठा असतो'.
जून महिन्यात वेस्ट इंडिजविरोधात युवराज सिंग शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत बांगलादेशविरोधात सेमीफायनल सामना खेळताना युवराजने 300 सामने खेळण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला.
'युवराज सिंग म्हणजे गॉड गिफ्ट आहे. मी त्याचा खूप मोठ चाहता असून यापुढे राहणार आहे. मात्र त्याला आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल, तसंच बोर्डावर धावाही दाखवाव्या लागतील', असं संदीप पाटील यांनी सांगितलं.
यावेळी संदीप पाटील यांनी महेंद्रसिंग धोनी एक स्पेशल प्लेअर असल्याचंही सांगितलं. श्रीलंकेला त्यांच्या मायभूमीवर व्हाइटवॉश देण्यात महेंद्रसिंग धोनीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. 'धोनी आणि युवराज सिंगचं भविष्य काय असेल यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. भारतीय संघासोबत काम करणारे यासंबंधी निर्णय घेतील. पण ते दोघेही स्पेशल प्लेअर्स आहेत. त्यांच्यातील पाच टक्के टॅलेण्ट तरी माझ्यात हवं होतं', असं संदीप पाटील बोलले आहेत.
संदीप पाटील यांनी यावेळी हार्दीक पांड्या एक उत्तम खेळाडू म्हणून उदयास येत असल्याची स्तुती केली. मात्र कपिल देव यांच्याशी तुलना केली जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यासाठी 200 वेळा जन्म घ्यावा लागेल असंही त्यांनी सांगितलं.