क्रिकेटच्या मैदानातील किंग विराट कोहली, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आणि हिटमॅन रोहित शर्मा या तिघांपैकी एकाची निवड या धाटणीतील प्रश्नाचा सामना करणं म्हणजे एखाद्या कडक बाउन्सरला सामोरे जाण्यासारखं असते. युवराज सिंगनं नुकताच याचा सामना करावा लागला.
रोहित, विराट अन् धोनीच्या प्रश्नासह युवीला बाउन्सर
क्लब प्रेयरी फायर यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टच्या खास शोमध्ये युवराज सिंग हा मायकल वॉन आणि एडम गिलख्रिस्टसोबत सहभागी झाला होता. त्यावेळी युवीला विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. या तिघांपैकी एकाची निवड करायची झाल्यास तुझी पसंती कोणाला असेल? असा प्रश्न भारताच्या माजी क्रिकेटरला विचारण्यात आला होता. यावर एकाचं नाव घेतलं तर त्याची हेडलाइन होईल, अस म्हणतं युवीनं हिटमॅन रोहित शर्माचं नाव घेतलं. मी कदाचित रोहित शर्मासोबत जाण्याला पसंती देईन. खास करून इवेंट जर टी-२० चा असेल तर यात तो नंबर वन कॅप्टन आहे. तो आपल्या बॅटिंगच्या जोरावर सामन्याला कलाटणी देऊ शकतो. त्यामुळे रोहित शर्मा हाच माझी पहिली पसंती असेल, असे उत्तर युवराज सिंगनं दिलं.
धोनीसह-रोहितन कॅप्टन्सीत सोडलीये विशेष छाप
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली वहिली टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. एवढेच नाही तर २०११ च्या वनडे वर्ल्ड कप शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रमही धोनीच्या नावे आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे भारतीय संघाला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या रोहित शर्मानं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन केले आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीत कोण मारेल बाजी? युवीनं यासंदर्भातही केली भविष्यवाणी
या शोमध्ये युवराज सिंगनं भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंदर्भातही भाष्य केले. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ बाजी मारेल, असे त्याने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघ ३-२ बाजी मारेल, असा अंदाज युवीनं व्यक्त केला आहे. मायकल वॉन याने ऑस्ट्रेलियन संघ ही मालिका ३-१ या फरकाने जिंकेल असे सांगितले. दुसरीकडे गिलख्रिस्टनं कांगारुंचा संघ ३-२ नं बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.