भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आगामी वन डे विश्वचषकाबद्दल एक मोठे विधान केले आहे. भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकात यजमान संघ जिंकेल की नाही याची मला खात्री नसल्याचे युवीने म्हटले आहे. याशिवाय त्याने भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाजांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. खरं तर ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे, तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १५ ऑक्टोबर रोजी आमनेसामने असणार आहेत.
आगामी वन डे विश्वचषकाबद्दल बोलताना युवीने एक धक्कादायक विधान केले. "प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मला खात्री नाही की भारतीय संघ विश्वचषक जिंकेल की नाही. कारण टीम इंडियातील काही खेळाडू अद्याप दुखापतीने ग्रस्त आहे. एक देशभक्त म्हणून मी सांगू शकतो की भारत जिंकेल. पण भारतीय संघातील मधली फळी दुखापतीने ग्रस्त आहे. मधल्या फळीतील खेळाडूंची दुखापत चिंतेचा विषय आहे", असे युवराज सिंगने सांगितले. तो एका क्रिकेट वेबसाईटशी बोलत होता.
भारताला विश्वचषक जिंकताना न पाहणे हे निराशाजनक - युवीमागील जवळपास दहा वर्षे भारताच्या खात्यात आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ आहे. मागील दहा वर्षांतील भारतीय संघाच्या चढ-उताराच्या कामगिरीवर बोलताना युवीने म्हटले, "भारत विश्वचषक जिंकू शकला नाही हे पाहणे निराशाजनक आहे, परंतु सगळे काही तेच आहे. आपल्याकडे रोहित शर्माच्या रूपात एक समंजस कर्णधार आहे. त्याने त्याचा योग्य वापर करायला हवा. आपल्याला आगामी मोठ्या स्पर्धेसाठी तयार होण्यासाठी काही सामने खेळणे आवश्यक आहे. १५ सदस्यीय संघ निवडण्यासाठी आमच्याकडे किमान तयार २० खेळाडू असणे आवश्यक आहेत", असेही त्याने सांगितले.
१५ ऑक्टोबरला IND vs PAK थरारआगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू