आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणखी एका लीगमध्ये दिसणार आहे. या लीगमध्ये पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीसह अनेक दिग्गज खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केलेला आहे. त्यांच्यात आता सिक्सर किंग युवीच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास युवी बूम बूम आफ्रिदीच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसेल.
निवृत्तीनंतर युवीनं ट्वेंटी-20 कॅनडा ग्लोबल लीगमध्ये सहभाग घेतला होता आणि आता तो दुबईत होणाऱ्या टी10 लीगमध्ये खेळताना दिसेल. या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले खेळाडू खेळणार आहेत. 2019च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघातील ट्रेव्हर बायलीस व मोईन अली हेही या लीगमध्ये दिसतील. 15 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ही लीग होणार आहे. लीगसाठीच्या ड्राफ्टमध्ये युवीचं नाव नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्याशी बोलणी सुरू आहे.
''युवीचं खेळणं जवळपास निश्चित झालेलं आहे. आशा करतो की त्याची घोषणा लवकरात लवकर करू. युवीसोबतची वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. बीसीसीआयच्या पॉलिसीनुसार आम्ही केवळ निवृत्त खेळाडूंनाच खेळवू शकतो,'' अशी माहिती टी10 लीगचे चेअरमन शाजी उल मुल्क यांनी दिली.
युवराज सिंगला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, पण...आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनावर निशाणा साधताना अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. त्याला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, परंतु त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा खरा नायक ठरलेल्या युवीला 2015नंतर 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याची खंत त्याच्या मनात आहे. काही महिन्यांपूर्वी युवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.