Yuvraj Singh, IPL 2025: टीम इंडियाला २ वर्ल्ड कप जिंकून देणारा युवराज सिंग आता IPL मध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. युवराज सिंग जगभरातील निवृत्त खेळाडूंच्या लीगमध्ये सहभाग घेत आहे. मात्र आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे. युवराज सिंगला आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याने युवीने १३२ आयपीएल सामन्यांमध्ये २७५० धावा केल्या आहेत. त्याने १३ अर्धशतकेही झळकावली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंग आता एका बड्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो असे बोलले जात आहे.
सध्या सुरु असलेल्या वृत्तानुसार, युवराज सिंग गुजरात टायटन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दिसू शकतो. GTचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि दिग्दर्शक विक्रम सोलंकी हे त्यांचे पद सोडण्याच्या मार्गावर आहेत. आगामी आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी हा मोठा फेरबदल होऊ शकतो असे बोलले जात आहे. गुजरात टायटन्स संघ व्यवस्थापनाने युवराज सिंगशी संपर्क साधला असल्याचीही चर्चा आहे.
युवराज सिंगने पंजाब, हैदराबाद, पुणे वॉरियर्स, बंगळुरू, मुंबई इंडियन्स अशा विविध संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. अशा परिस्थितीत युवी गुजरात टायटन्स संघाकडून प्रशिक्षक म्हणून दिसू शकतो. युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक बनल्यास त्याला मोठी रक्कम मिळू शकते. रिपोर्ट्सनुसार, गुजरात टायटन्स प्रत्येक हंगामात आशिष नेहराला ३.५० कोटी रुपये देत होती. युवराजसाठी ही रक्कम वाढवली जाऊ शकते.