ठळक मुद्देयुवराज सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार खराब कामगिरीमुळेच मिळाला कमी भावमिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा निर्धार
मुंबई : भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगइंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. जयपूर येथे मंगळवारी पार पडलेल्या लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सने युवीला एक कोटी मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मात्र, पहिल्या टप्प्यात त्याला आपल्या चमूत घेण्यासाठी एकाही संघाने उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे युवीचे चाहते आणि क्रिकेट एक्सपर्ट्सनी आश्चर्य व्यक्त केले होते. युवराजला मात्र यात काहीच आश्चर्य वाटले नाही.
मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला,''मी निराश झालो नाही. हे अपेक्षितच होते आणि पहिल्या फेरीत मला कोणताच संघ घेणार नाही, याची कल्पना होतीच. त्यामागचं कारणही साहजिकच आहे. आयपीएलमध्ये संघ उभारताना युवा खेळाडूंवर अधिक भर दिला जातो. मलाही त्या वयात कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे अखेरच्या फेरीत कोणतातरी संघ घेईल, इतकीच आशा मी करत होतो.''
37 वर्षीय युवराजची सध्याची कामगिरी तितकीशी बोलकी नाही. त्याने स्थानिक क्रिकेटमध्येही फारसा सहभाग घेतलेला नाही. तरीही त्याने निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही. त्याला अजूनही 2019च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची आस आहे आणि आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. '' मुंबई इंडियन्सकडून मला खेळण्याची संधी मिळेल, असे सतत वाटत होते. मुंबई इंडियन्सने दिलेल्या या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार आहे,''असेही तो म्हणाला.
सिक्सर किंग युवराजची यंदाच्या लिलावासाठी मूळ किंमत एक कोटी ठेवण्यात आली होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत युवराजवर कुणीही बोली लावली नव्हती. त्यावेळी युवराज आता आयपीएलमधून बाहेर जाणार, अशी चर्चा सुरु झाली होती. पण मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सत्रात युवराजला आपल्या संघात सामील करून घेतले. या समावेशामध्ये मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरचा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे.