मुंबई : आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारलेल्या युवराज सिंगची पुन्हा एकदा फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमधील टोरोंटो नॅशनल्स संघाने त्याला करारबद्ध केले आहे. जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळता यावे यासाठी युवराजने निवृत्ती स्वीकारली. त्यानं त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे परवानगीसाठी पत्रही पाठवले होते. बीसीसीआयच्या नियमानुसार सक्रीय खेळाडू परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. त्यामुळेच युवीनं आंतरराष्ट्रीय व स्थानिक क्रिकेटला रामराम ठोकला. बीसीसीआयच्या या नियमांची पूर्ती केली आहे. त्यामुळे 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या लीगमध्ये युवी 22 सामने खेळणार आहे.
टोरोंटो नॅशनल्ससह ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये आणखी पाच संघांचा समावेश आहे. यात व्हॅनकोव्हर नाईट्स, विनिपेग हॉक्स, एडमोंटोन रॉयल्स, माँट्रीअल टायगर्स आणि ब्रॅम्प्टन वोल्वेस यांचा समावेश आहे. युवराजसह पंजाबचा मनप्रीत गोनीही या लीगमध्ये खेळणार आहे. शिवाय युवीच्या संघात ब्रेंडन मॅकलम, किरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या दिग्गजांचाही समावेश आहे. अन्य संघांमध्ये सुनील नरीन, थिसारा परेरा, केन विलियम्सन, फॅफ ड्यू प्लेसिस, बेन कटिंग, ख्रिस गेल, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, जेपी ड्युमिनी, ड्वेन ब्राव्हो, डॅरेन सॅमी, शकिब अल हसन, शाहिद आफ्रिदी या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे.
याशिवाय युवी अन्य परदेशी ट्वेंटी-20 लीगमध्येही खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली. मुंबईत एका कार्यक्रमात ही घोषणा करताना युवराजचे डोळे पाणावलेले होते. युवराज हा भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार होता. त्याने 2012मध्ये अखेरची कसोटी, तर 2017मध्ये अखेरच्या मर्यादित षटकांचा सामना खेळला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता.
निवृत्ती जाहीर करताना युवराज म्हणाला होता की,'' ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये खेळण्याची माझी इच्छा आहे. या वयात मनोरंजनासाठी मी क्रिकेट खेळू शकतो. आता मला आयुष्याचा आनंद लुटायचा आहे."
Web Title: Yuvraj Singh play for Toronto Nationals in Global T20 Canada
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.