नवी दिल्ली: १९८३ नंतर थेट २०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकून कोट्यवधी देशवासीयांचे स्वप्न पूर्ण केले होते. त्या विश्वचषक विजयाला ११ वर्षे आता पूर्ण होत आहेत. हजारो क्रिकेट रसिकांच्या मनात २०११ च्या विश्वचषक विजयाच्या असंख्य आठवणी आजही ताज्या आहेत. विश्वचषक विजयातील महत्त्वाचा खेळाडू म्हणजे भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग. (Yuvraj Singh) युवराज सिंगने विश्वचषक विजयाच्या आठवणी शेअर करत, सचिन तेंडुलकरसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा होता, असे म्हटले आहे.
भारतीय संघाने २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या मुंबईत झालेल्या शिखर लढतीत श्रीलंकेचा पराभव करून २८ वर्षानंतर विजेतेपद पटकावले. २०११ चा विश्वचषक युवराज सिंगसाठी संस्मरणीय होता. त्या विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगने ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ विकेट घेतल्या होत्या. युवराजला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यातही आले होते. टीम इंडियासाठी युवराज सिंग हा स्टार परफॉर्मर होता. युवराज सिंगने विश्वचषक विजयाच्या महान क्षणाची आठवण करून दिली आणि चषक मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केला.
एक अब्ज भारतीयांचे पूर्ण करायचे स्वप्न होते
हा फक्त विश्वचषक विजय नव्हता... हे एक अब्ज भारतीयांचे पूर्ण करायचे स्वप्न होते. मला या संघाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे ज्याला संपूर्ण देशासाठी आणि अतिशय खास व्यक्ती सचिन तेंडुलकरसाठी चषक जिंकायचा होता. तिरंगा परिधान करून देशाला गौरव मिळवून देण्याच्या अभिमानाची बरोबरी कशासोबतच होऊ शकत नाही, या शब्दांत युवराज सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण संघाला विश्वचषक जिंकायचाच होता, विशेषत: सचिनसाठी, कारण त्यांना माहित होते की हा त्याचा शेवटचा विश्वचषक आहे, असे युवराज सिंगने यापूर्वी म्हटले होते.
दरम्यान, सन २०११ मधील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला २७४ धावांवर रोखले आणि त्यानंतर १० चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग केला. भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला आणि पुन्हा प्रतिष्ठित विजेतेपद मिळविण्यासाठी २८ वर्षे वाट पहावी लागली.