Yuvraj Singh and Virat Kohli : माजी ऑल राउंडर युवराज सिंग त्याच्या चमकदार कामगिरीसाठी जगभरात ओळखला जातो. 2007 मध्ये टी-20 आणि 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात युवराजचा सर्वात मोठा वाटा होता. 2011 चा विश्वचषकही त्याच्यासाठी खास होता, कारण त्यावेळी युवराज कॅन्सरशी झुंज देत होता आणि तशाच परिस्थितीत त्याने दमदार कामगिरी करत प्लेअर ऑफ टूर्नामेंटचा किताब मिळवला होता.
युवराज सिंग केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठीच नाही तर त्याच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जातो. युवराजचे आयुष्य आणि इतर खेळाडूंसोबतचे त्याचे नाते जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. अशातच भारताचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकातून युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. युवराज सिंगने विराट कोहलीसोबत सराव करण्यास नकार दिल्याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.
2016 सालची गोष्टघटना 2016 ची आहे. प्रशिक्षक आर श्रीधर यांनी त्यांच्या "कोचिंग बियॉन्ड: माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम" या पुस्तकात लिहिले की, 'जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार होती. खेळ सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडू अॅडलेडमध्ये सराव करत होते. त्यावेळी विराट कोहली प्रत्येक खेळाडूकडून कसून मेहनत करुन घेत होता. त्या सरावादरम्यान युवराज सिंगही मैदानावर पोहोचला. मला आशा होती की युवराजही उर्वरित संघासोबत सराव करेल, पण तो थेट डगआऊटवर जाऊन बसला आणि आमच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला.
श्रीधर पुढे लिहितात, विराट जोपर्यंत सरावात आहे तोपर्यंत युवराज डगआउटमध्येच बसला. काही वेळाने कोहली मैदानातून परतल्यावर युवराज सिंग मैदानात सरावासाठी आला. तेव्हा युवराज मला म्हणाला, मी इतरांसोबत सराव केला नाही, कारण मला वाटत नाही की मी विराटच्या वेगाशी किंवा उत्साहाशी बरोबरी करू शकेन. तो फिटनेस फ्रीक आहे, म्हणून मी तुम्हाला एकट्याने सराव करू दिला.
ते पुढे म्हणाले, दुसऱ्या दिवशी खेळपट्टीवर ख्रिस लिनने हार्दिकच्या चेंडूवर शॉट मारला तेव्हा युवराजने शॉर्ट कव्हरवर शानदार झेल घेतला. युवराजने त्या दिवशी विराटसोबत सराव करण्यास का नकार दिला, हे त्या दिवशी मला समजले. प्रत्येक खेळाडूची इंटेंसिटी लेव्हल वेगळी असते. दरम्यान, प्रशिक्षक श्रीधर यांच्या या पुस्तकात सर्व खेळाडूंशी संबंधित गोष्टी शेअर करण्यात आल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी धोनीला एकदा राग आल्याचा किस्साही शेअर केला आहे.