Yuvraj Singh On Rohit Sharma And Virat Kohli : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली अनेकांच्या निशाण्यावर आले आहेत. टीम इंडियातील या स्टार खेळाडूंच्या फ्लॉप शो मुळेच टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली, अशी चर्चा रंगत असून या दोघांनी निवृत्ती घ्यावी, असा ट्रेंडही सोशल मीडियावर पाहायला मिळाला. माजी क्रिकेटर इरफान पठाण आणि हरभजन सिंग यांनी टीम इंडियातील 'सुपरस्टार कल्चर' बंद करा म्हणत या स्टार खेळाडूंवर निशाणाही साधल्याचे पाहायला मिळाले. आता या दोघांच्या सपोर्ट करण्यासाठी माजी क्रिकेटर आणि सिक्सर किंग युवराज सिंगनं फटकेबाजी केलीये. ऑस्ट्रेलियातील पराभव हा काही फार मोठा नाही, असे म्हणत त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचीही पाठराखण केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय म्हणाला युवराज सिंग?
युवराज सिंगनं या दोघांचा बचाव करताना घरच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवाचाही दाखला दिला आहे. भारतीय संघानं न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका गमावली तो क्षण निराशजनक होता. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पराभव त्या तुलनेत खूप छोटा आहे. एवढेच नाही तर भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या अनुभवी खेळाडूंसंदर्भात आपण काय बोलतोय, त्याचा विचार करायला हवा, अशी भावना युवीनं व्यक्त केलीये.
ऑस्ट्रेलियातील पराभव काही फार मोठी गोष्ट नाही
भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्धचा पराभव जिव्हारी लागणारा होता. कारण घरच्या मैदानात आपण ३-० अशी मालिका गमावली. ही गोष्ट मनाला पटणारी नव्हती, हे मान्य करतो. पण बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पराभव फार मोठा वाटत नाही. कारण याआधी दोन वेळा संघाने ऑस्ट्रेलियाचे मैदान मारले आहे. मागील काही वर्षात संघानं दमदार कामगिरी करून दाखवली आहे.
रोहित विराटवर टीका करणं चुकीचं
विराट कोहलीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ९ सामन्यात फक्त १९० धावा केल्या. यात त्याच्या एका शतकाचा समावेश होता. दुसरीकडे रोहित शर्मानं ५ सामन्यात फक्त ३१ धावा केल्या. युवराज सिंगन या दोन स्टार खेळाडूंचे भारतीय क्रिकेटमधील योगदान आणि मागच्या कामगिरीचा दाखला देत त्यांच्यावर टीका करणं चुकीचं आहे असे म्हटले आहे. युवराज म्हणाला की,
आपण विराट कोहली आणि रोहित शर्मा या आपल्या महान खेळाडूंबद्दल खूप वाईट बोलत आहोत. त्यांनी याआधी संघासाठी जे केलं ते लोक विसरलेत. आजही या खेळाडूंचा महान क्रिकेटर्सच्या यादीत समावेश केला जातो. ते चांगले खेळले नाहीत, ते हारले हे मान्य. या गोष्टीमुळे ते आपल्यापेक्षा अधिक दु:खी असतील.
या पराभवातून सावरून स्टार खेळाडूंसह टीम इंडिया दमदार कमबॅक करेल, असा विश्वासही युवराज सिंगनं व्यक्त केला आहे.