मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंग सध्या विविध व्यावसायिक क्रिकेट लीगमध्ये खेळत असून लवकरचा त्याचा तुफानी जलवा अबुधाबी टी१० लीग या स्पर्धेत पाहण्यास मिळेल. नुकत्याच झालेल्या कॅनडा टी२० लीगमध्ये युवीचा खेळ पाहण्यास मिळाला. त्यानंतर आता क्रिकेटच्या सर्वात छोट्या आणि आक्रमक अशा टी१० लीगममध्य मराठा अरेबियन्स संघाने युवराजची आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली आहे.
जगभरातील विविध लीगमध्ये खेळण्यासाठी युवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. बीसीसीआयच्या नियमानुसार सक्रिय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नसते. निवृत्तीनंतर युवी टी२० कॅनडा लीगममध्ये टोरंटो नॅशनल्स संघाकडून खेळला. युवराजने सांगितले की, ‘टी१० या रोमांचक लीगमध्ये सहभागी होणे शानदार आहे. टीम मराठा अरेबियन्स संघाकडून या लीगमध्ये खेळण्यास मी सज्ज आहे.’ गेल्या सत्राप्रमाणेच या संघाचे नेतृत्त्व वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्रावोकडे असेल.
आठ संघ जेतेपसाठी भिडणारटी१० क्रिकेट लीगचे यंदाचे तिसरे सत्र असून ही लीग १५ ते २४ नोव्हेंबर दरम्यान अबूधाबी येथे खेळविण्यात येईल. यंदा या लीगममध्ये एकूण ८ संघ जेतेपदासाठी भिडणार असून याआधीच्या दोन सत्रांमध्ये ही स्पर्धा ५ संघांमध्ये पार पडली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विदेशी लीगमध्ये खेळणार युवराज पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्याने ग्लोबल टी२० कॅनडा लीगमध्ये टोरंटो नॅशनल्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते.